पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरची न्यूझीलंड दौऱ्यातील मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी निवड करण्यात आली आहे. २०१० साली इंग्लंडच्या दौऱ्यात स्पॉट-फिक्सिंग प्रकरणात आमिर दोषी आढळला होता. त्यानंतर त्याच्यावर बंदीची कारवाई करण्यात आली होती. ही शिक्षा पूर्ण केल्यावर त्याची पहिल्यांदाच पाकिस्तानच्या संघात निवड करण्यात आली आहे.

इंग्लंडमधील स्पॉट-फिक्सिंग प्रकरणात दोषी आढळल्यावर आमिरवर पाच वर्षांची बंदी घालण्यात आली होती. त्याचबरोबर त्याची तुरुंगातही रवानगी करण्यात आली होती, पण ही शिक्षा पूर्ण केल्यावर राष्ट्रीय शिबिरामध्ये त्याची निवड करण्यात आली होती. त्याच्या या निवडीवर कर्णधार अझर अलीने आक्षेप घेत पदाचा राजीनामा दिला होता, पण पाकिस्तान क्रिकेट मंडळातील (पीसीबी) काही अधिकाऱ्यांनी अलीची समजूत घालत राजीनामा मागे घ्यायला सांगितला होता. आमिरने अलीची माफी मागितली आणि त्यानंतर अलीने कर्णधारपदाचा राजीनामा मागे घेतला होता.

‘‘न्यूझीलंड दौऱ्यातील मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी आम्ही मोहम्मद आमिरची निवड केली आहे. गेल्या वर्षभरात त्याने स्थानिक क्रिकेटमध्ये नेत्रदीपक कामगिरी केली आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचण्यासाठी त्याने मेहनतही घेतली आहे. त्यामुळे त्याला संघात घेण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे,’’ असे निवड समितीचे अध्यक्ष हरून रशिद यांनी सांगितले.

आमिरची संघात निवड झाली असली तरी त्याला अजूनही न्यूझीलंडचा व्हिसा मिळालेला नाही. याबाबत रशिद म्हणाले की, ‘‘जर आमिरच्या व्हिसाची काही समस्या पुढे आली तर त्याच्या जागी ट्वेन्टी-२० मालिकेसाठी वेगवान गोलंदाज मोहम्मद इरफानला पाठवण्यात येईल.’’

ट्वेन्टी-२० संघ : शाहिद आफ्रिदी (कर्णधार), मोहम्मद हफिझ, अहमद शेहझाद, सोएब मकसूद, उमर अकमल, साद नसिम, शोएब मलिक, इफ्तिकार अहमद, मोहम्मद रिझवान, सर्फराझ अहमद, अन्वर अली, आमीर यामीन, इमाद वसिम, वहाब रियाझ, मोहम्मद आमिर आणि उमर गुल. राखीव खेळाडू : मोहम्मद इरफान.

एकदिवसीय संघ : अझर अली (कर्णधार), मोहम्मद हफिझ, अहमद शेहझाद, सोएब मकसूद, शोएब मलिक,

असद शफिक, बाबर आझम, झफर गोहर, अन्वर अली, इमाद वसिम, सर्फराझ अहमद, वहाब रियाझ, राहत अली, मोहम्मद इरफान, मोहम्मद रिझवान, मोहम्मद आमिर.