पेनल्टी कॉर्नरसारख्या हुकमी संधी वाया घालवल्यामुळेच भारताला जागतिक हॉकी लीगमध्ये पाकिस्तानविरुद्ध २-२ अशा बरोबरीत समाधान मानावे लागले.
भारत-पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्धी संघांमधील या लढतीविषयी कमालीची उत्कंठा निर्माण झाली होती. रमणदीप सिंगने १३व्या मिनिटाला भारताचे खाते उघडले, परंतु २३व्या मिनिटाला पाकिस्तानच्या इम्रान महम्मदने पेनल्टी स्ट्रोकद्वारे गोल करत बरोबरी साधली. पूर्वार्धात १-१ अशी बरोबरी होती. उत्तरार्धात सामन्याच्या ३५व्या मिनिटाला इम्रान महम्मदने पेनल्टी कॉर्नरद्वारे गोल केला व संघाला २-१ असे आघाडीवर नेले. मात्र, त्यानंतर तीनच मिनिटांनी पुन्हा रमणदीपने गोल करत २-२ अशी बरोबरी साधली.
पोलंडविरुद्ध सफाईदार खेळ करणाऱ्या भारताला पाकिस्तानच्या धारदार आक्रमणापुढे अपेक्षेइतका अव्वल दर्जाचा खेळ करता आला नाही. भारतीय खेळाडूंवर पाकिस्तानचे दडपण आहे, याचा प्रत्यय सुरुवातीपासूनच दिसून आला. भारताने चांगल्या चाली केल्या, मात्र पाकिस्तानचा गोलरक्षक इम्रान बटने सुरेख गोलरक्षण करीत या चाली थोपवून धरल्या. अखेर १३व्या मिनिटाला गुरमेल सिंगने २५ यार्ड्स अंतरावरून दिलेल्या पासवर रमणने सूर मारून अप्रतिम गोल केला. पूर्वार्ध संपण्यापूर्वी पाकिस्तानने गोल करण्यात यश मिळवले. त्यांना २२व्या मिनिटाला लागोपाठ दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले. त्यामध्ये चाली रोखताना भारतीय खेळाडूंकडून झालेल्या चुकीमुळे पंचांनी पाकिस्तानला पेनल्टी स्ट्रोक बहाल केला. त्याचा फायदा घेत इम्रानने अचूक गोल केला. पूर्वार्ध संपण्यापूर्वी एक मिनिट बाकी असताना भारताचा सतबीर सिंगला पिवळे कार्ड दाखवण्यात आले. त्यामुळे त्याला मैदान सोडावे लागले.
उत्तरार्धाच्या प्रारंभापासूनच पाकिस्तानने पुन्हा जोरदार चाली केल्या. त्यांना ३५व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळाला. त्याचा फायदा घेत इम्रानने गोल केला. मात्र लगेचच रमणने भारताचा गोल करीत बरोबरी साधली. सतबीरपाठोपाठ देविंदर वाल्मीकी याच्यावरही बेशिस्त वर्तनाची कारवाई झाली. त्यामुळे काही काळ भारताचे नऊ खेळाडू मैदानात होते. त्यामुळेच भारताच्या चालींवर मर्यादा आल्या होत्या. पूर्वार्धात युवराज वाल्मीकीच्या नडगीवर स्टीक बसल्यामुळे त्याला थोडा वेळ विश्रांती घ्यावी लागली. त्याचाही परिणाम भारताच्या आक्रमणावर झाला. भारताने दोन्ही पेनल्टी कॉर्नर वाया घालवले. या संधींचा फायदा त्यांनी घेतला असता तर कदाचित भारताला मोठा विजय मिळवता आला असता. भारताचा गोलरक्षक श्रीजेशने उल्लेखनीय बचावात्मक खेळ केला. पाकिस्तानला चार पेनल्टी कॉर्नर मिळाले, त्यापैकी त्यांनी एक कॉर्नरवर गोल केला. त्यांचा गोलरक्षक इम्रान बटने अनेक गोल वाचवले.