पाकिस्तान हा शांती प्रिय देश आहे. आम्हाला सर्वच देशांसोबत सहकार्याचे संबंध हवे असून युद्ध झाल्यास दोन्ही देशांनाच याच फटका बसेल असे पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने म्हटले आहे. चर्चेद्वारे प्रश्न सुटणार असेल तर कठोर पावले का उचलावीत असा प्रश्नही त्याने उपस्थित केला आहे.

भारतीय सैन्याने उरी हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी बुधवारी मध्यरात्री पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवाद्यांचे तळ उध्वस्त केले होते. भारताच्या या कारवाईचे देशभरातून स्वागत होत आहे. पाकिस्तानने मात्र भारतीय सैन्याने सर्जिकल स्ट्राईक केलेच नाही असा दावा केला आहे.  दोन्ही देशांमधील संबंध ताणलेले असतानाच या वादात आता क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीनेही उडी घेतली आहे. शाहिद आफ्रिदीने शुक्रवारी ट्विटरद्वारे या वादावर प्रतिक्रिया दिली आहे. यात आफ्रिदीने पाकिस्तान हा शांतीप्रिय देश असल्याचे म्हटले असून पाकिस्तानला शेजारी देशांशी सहकार्याचे संबंध ठेवायचे आहेत. दोन्ही देशांमध्ये युद्ध व्हायला नको असे आफ्रिदीने म्हटले आहे.

 

शाहिद आफ्रिदीच्या या ट्विटचा भारतातील युजर्सनी चांगलाच समाचार घेतला आहे.  पाकिस्तान हा शांतताप्रिय देश आहे हे आफ्रिदीचे मत विनोद असल्याचे सांगत युजर्सने आफ्रिदीची खिल्ली उडवली.  तर एका युजरने पाकिस्तानसोबत भारताने चर्चेला प्राधान्य दिले. पण त्यामोबदल्यात भारताला काय मिळाले असा प्रश्नही उपस्थित केला. तर काही जणांनी शाहिद आफ्रिदीच्या निवृत्तीचा मुद्दा मांडला. दोन्ही देशांना बाकी काही नको, फक्त तुझी निवृत्ती हवी असे एका युजरने म्हटले आहे.