पाकिस्तानचा संघ दिवस-रात्र स्वरूपाचा म्हणजेच प्रकाशझोतातील कसोटी सामना खेळणारा पहिला कसोटी संघ म्हणून क्रिकेट इतिहासात आपले नाव कोरण्यासाठी उत्सुक आहे. संयुक्त अरब अमिरातीमध्ये श्रीलंकेविरुद्ध मालिकेत हे घडण्याची चिन्हे आहेत.
डिसेंबर-जानेवारी या महिन्यांमध्ये पाकिस्तान श्रीलंकेशी अनुक्रमे अबुधाबी, शारजा किंवा दुबई या ठिकाणी तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेतील एक कसोटी सामना प्रकाशझोतात खेळविण्याचा प्रस्ताव पाकिस्तानने श्रीलंका क्रिकेट मंडळाला पाठवला आहे.
‘‘आम्ही संयुक्त अरब अमिरातीसारख्या तटस्थ ठिकाणी गेल्या काही वर्षांत कसोटी मालिका खेळलो आहोत. दिवस-रात्र कसोटी सामन्यांमुळे खूप व्यावसायिक फायदा होऊ शकेल,’’ असे पाकिस्तान क्रिकेट मंडळा(पीसीबी)च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
पीसीबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुभान अहमद यांनी सांगितले की, ‘‘यासंदर्भात आमची श्रीलंका क्रिकेट मंडळाशी गांभीर्याने चर्चा सुरू आहे. दिवस-रात्र स्वरूपाचा कसोटी सामना क्रिकेटरसिकांना नक्कीच आकर्षित करू शकेल. त्यामुळे आम्ही किमान एखादा कसोटी सामना प्रकाशझोतात व्हावा, यासाठी उत्सुक आहोत.’’
संयुक्त अरब अमिरातीमध्ये दुसऱ्यांदा पाकिस्तान-श्रीलंका कसोटी मालिका प्रस्तावित आहे. यातील पहिला सामना ३१ डिसेंबरला सुरू होईल. याचप्रमाणे अबुधाबी आणि शारजाला अनुक्रमे ८ जानेवारीपासून दुसरा आणि १६ जानेवारीपासून तिसरा सामना सुरू होणार आहे.