बांगलादेशमध्ये निर्माण झालेल्या पाकिस्तानविरोधी वातावरणाचा फटका या दोन देशांतील क्रिकेट संबंधांना बसण्याची शक्यता आहे. परिस्थिती चिघळू नये यासाठी पाकिस्तानचा संघ पुढील वर्षी बांगलादेशमध्ये होणाऱ्या आयसीसी ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा तसेच आशिया चषक स्पर्धा यातून माघार घेण्याची चिन्हे आहेत.  
बांगलादेशमध्ये तयार झालेल्या पाकिस्तानविरोधी वातावरणामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (पीसीबी) चिंता वाटत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) यासंदर्भात काय निर्णय घेते याकडे आमचे लक्ष लागले आहे. पुढील वर्षी मार्च-एप्रिलमध्ये बांगलादेशमध्ये ट्वेन्टी-२० विश्वचषकाचे आयोजन करायचे की नाही, याबाबत जानेवारीत आयसीसी निर्णय घेईल. जर आयसीसीने विश्वचषक अन्य ठिकाणी घेण्याचा निर्णय घेतला तर फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या आशिया चषकाचे आयोजनही अन्य ठिकाणी केले जाऊ शकते. आयसीसीच्या निर्णयाची आम्हाला प्रतीक्षा आहे’, असे पीसीबीच्या सूत्रांनी सांगितले.
ट्वेन्टी-२० विश्वचषक आणि आशिया चषक या दोन्ही स्पर्धा आंतरराष्ट्रीय स्वरूपाच्या असल्याने याप्रकरणी आयसीसी आणि आशियाई क्रिकेट काऊन्सिलच्या भूमिकेकडे लक्ष असल्याचेही त्यांनी पुढे सांगितले. बांगलादेशमध्ये पर्याप्त सुरक्षित वातावरण नसेल तर पाकिस्तान सरकार पीसीबीला दौरा रद्द करण्याचा सल्ला देऊ शकते.
बांगलादेशने पाकिस्तानशी असलेले सर्व प्रकारचे संबंध संपुष्टात आणावेत, अशी मागणी निदर्शकांतर्फे केली जात आहे. दरम्यान पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने या प्रकरणाची दखल घेतली असून, ते बांगलादेशमधील परिस्थितीचा आढावा घेत आहे. बांगलादेशमध्ये क्रिकेट दौरा करावा की नाही, यासंदर्भात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला योग्य तो सल्ला देऊ, असे या मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान जानेवारीमध्ये होणाऱ्या निवडणुकीनंतर परिस्थिती निवळेल आणि दोन्ही देशांतील संबंध सुधारतील आणि पाकिस्तानचा संघ या स्पर्धामध्ये सहभागी होईल, असा विश्वास बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
आश्वासन देऊनही, सुरक्षेच्या कारणास्तव दोनदा पाकिस्तानचा दौरा रद्द केल्याने बांगलादेश क्रिकेट बोर्ड आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड यांच्यातील संबंध दुरावले होते. पाकिस्तान क्रिकेट बोर्डामध्ये बांगलादेशविरोधी गट आहे, बांगलादेशमधील परिस्थिती सुधारली नाही तर पाकिस्तानचा संघ बांगलादेशमध्ये होणाऱ्या स्पर्धातून माघार घेऊ शकतो, असे संकेत पीसीबीच्या सूत्रांनी दिले आहेत.
पाकिस्तानने ट्वेन्टी-२० विश्वचषक आणि आशिया चषक स्पर्धातून माघार घेतल्यास आयसीसीच्या अर्थकारणावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. ट्वेन्टी-२० विश्वचषकात होणाऱ्या भारत आणि पाकिस्तान लढतीमधून स्पर्धेची २५ टक्के मिळकत होणार असल्याने पाकिस्तानची माघार आयसीसीकरिता चिंतेचा विषय ठरू शकते.