पाकिस्तानचे महिला विश्वचषक क्रिकेट स्पध्रेतील सामने अन्यत्र हलवावे, अशी विनंती मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) आणि स्थानिक पोलिसांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (आयसीसी) केली आहे.
एमसीएच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी मुंबईत झालेल्या एका महत्त्वाच्या बैठकीमध्ये महिला विश्वचषकाचा स्पर्धा संचालक सुरू नायक यांनी एमसीएचे काही पदाधिकारी आणि पोलीस दलातील महत्त्वाच्या अधिकाऱ्यांसमवेत चर्चा केली.
‘‘महिला क्रिकेटपटूंना पुरेशी सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात येईल. परंतु यासंदर्भातील जनभावना कळविणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत मुंबईत सामने झाल्यास राजकीय पक्षांच्या विरोधाचे आव्हान असेल,’’ असे एमसीएच्या पदाधिकाऱ्याने सांगितले. ‘‘बैठकीत झालेल्या चर्चाची नायक आयसीसीला माहिती देतील आणि २४ तासांत यासंदर्भात पुढील निर्णय मिळू शकेल,’’ असे ते पुढे म्हणाले.