06 March 2021

News Flash

पाकिस्तानवरील संकट कायम

आज अपराजित न्यूझीलंडशी सामना

(संग्रहित छायाचित्र)

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या विजयामुळे पाकिस्तानला जीवदान मिळाले असले तरी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील आव्हान टिकवण्यासाठीची त्यांची धडपड कायम आहे. बुधवारी त्यांचा सामना आतापर्यंत अपराजित राहणाऱ्या बलाढय़ न्यूझीलंड संघाशी होणार आहे.

परंपरागत प्रतिस्पर्धी भारताकडून ४९ धावांनी पराभूत झाल्यानंतर पाकिस्तानच्या कामगिरीवर जोरदार टीका झाली. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या विजयामुळे आशा शाबूत राहिल्या आहेत. परंतु हा उपांत्य फेरीच्या वाटचालीचा मार्ग अधिक खडतर आहे. कारण पाकिस्तानने सहा सामन्यांत दोन विजय आणि एका अनिकाली सामन्याचे एकूण पाच गुण कमावले आहेत. त्यामुळे पाकिस्तानचे भवितव्य न्यूझीलंड, अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांच्याविरुद्धचे उर्वरित सामने जिंकूनही अन्य अनुकूल निकालांवर अवलंबून राहावे लागणार आहे.

पाकिस्तानच्या फलंदाजीच्या फळीतही समस्या आहेत. सलामीच्या सामन्यानंतर डावलण्यात आलेला डावखुरा फलंदाज हॅरिस सोहेलने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात ५९ चेंडूंत ८९ धावांची धडाकेबाज खेळी साकारली. त्यामुळेच पाकिस्तानला ७ बाद ३०८ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली.

न्यूझीलंडचा संघ पाकिस्तानच्या तुलनेत अधिक बळकट आणि गुणतालिकेतील अव्वल स्थान सांभाळून आहे. कर्णधार केन विल्यम्सनने ८०.५६च्या सरासरीने ३७३ धावा केल्या आहेत. अनुभवी रॉस टेलरने धावांचे सातत्य कायम राखले आहे. परंतु सलामीवीर कॉलिन मुन्रो आणि मार्टिन गप्टिल अजूनही आपल्या दर्जाला साजेशी फलंदाजी करू शकलेले नाहीत. याशिवाय जिमी नीशाम आणि कॉलिन डी’ग्रँडहोम हे धडाकेबाज अष्टपैलू खेळाडू त्यांच्याकडे आहेत.

भारताविरुद्धच्या पराभवानंतर आत्म हत्येच्या विचारात होतो

लंडन : भारताविरुद्धच्या पराभवानंतर आत्महत्या करण्याच्या विचारात होतो, असा गौप्यस्फोट पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक मिकी आर्थर यांनी केला आहे. मँचेस्टर येथे १६ जूनला झालेल्या भारताविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानचा संघ ८९ धावांनी पराभूत झाल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद उमटले. प्रसारमाध्यमे, चाहते आणि माजी क्रिकेटपटूंनी पाकिस्तानी संघावर कडाडून टीका केली. त्यामुळे माझ्या मनात आत्महत्येचे विचार आले होते, असे आर्थर यांनी सांगितले.

विल्यम्सनचे प्रेरणादायी सातत्य

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यापासून विल्यम्सन संघाला प्रेरणा देत आहे. दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यांत न्यूझीलंडने निसटते विजय मिळवले आहेत. या दोन्ही विजयांत कर्णधार विल्यम्सनच्या शतकांचा महत्त्वाचा वाटा होता. अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यातही विल्यम्सनने नाबाद ७९ धावांची खेळी साकारली होती.

..तर एका सामन्याची बंदी

ट्रेंट बोल्ट आणि लॉकी फग्र्युसन यांच्यावर न्यूझीलंडच्या गोलंदाजीची मदार आहे. परंतु नियोजित वेळेत षटके पूर्ण करण्यात ते अपयशी ठरत आहेत. आणखी एका सामन्यात न्यूझीलंडवर षटकांची गती धिमी राखल्यास विल्यम्सनवर एका सामन्याच्या निलंबनाची कारवाई होऊ शकते.

वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिर हा पाकिस्तानच्या वेगवान माऱ्याची धुरा समर्थपणे सांभाळत आहे. आतापर्यंत १५ बळी मिळवणारा हा गोलंदाज यंदाच्या विश्वचषकात सर्वाधिक बळी मिळवणाऱ्या गोलंदाजांमध्ये संयुक्तपणे अग्रेसर आहे. परंतु त्याला दुसऱ्या बाजूने तोलामोलाची साथ मिळत नसल्यामुळे पाकिस्तानच्या कामगिरीवर परिणाम होत आहे. आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात आमिरने दोन बळी घेतले, तर शदाब खान आणि वहाबने प्रत्येकी तीन बळी घेतले होते.

सामना क्र. 33

पाकिस्तान वि. न्यूझीलंड

स्थळ : ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम

सामन्याची वेळ : दुपारी ३ वा.

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स २,स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट १, स्टार स्पोर्ट्स हिंदी १

संघ

न्यूझीलंड : केन विल्यम्सन (कर्णधार), रॉस टेलर, मार्टिन गप्तिल, कॉलिन मन्रो, टॉम लॅथम (यष्टिरक्षक), कॉलिन डी’ग्रँडहोम, जेम्स निशाम, मॅट हेन्री, ट्रेंट बोल्ट, टीम साऊदी, मिचेल सँटनर, इश सोधी, टॉम ब्लंडेल, लॉकी फग्र्युसन, हेन्री निकोल्स.

पाकिस्तान : सर्फराझ अहमद (कर्णधार व यष्टिरक्षक), इमाम-उल-हक, फखर झमान, बाबर आझम, मोहम्मद हफीझ, शोएब मलिक, इमाद वसिम, शादाब खान, शाहिन आफ्रिदी, हसन अली, मोहम्मद आमिर, वहाब रियाझ, हॅरिस सोहेल, आसिफ अली, मोहम्मद हसनैन.

आमनेसामने

एकदिवसीय सामने : १०६, न्यूझीलंड : ४८, पाकिस्तान : ५४, टाय / रद्द :१/ ३

विश्वचषकात   सामने : ८, न्यूझीलंड : २,

पाकिस्तान : ६, टाय / रद्द :०/०

क्षेत्ररक्षणावर आम्ही अधिक मेहनत घेण्याची आवश्यकता आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात आम्ही बरेच झेल सोडले. यापैकी काही थेट होते, तर काही अवघड होते. आता उर्वरित तिन्ही सामने आमच्यासाठी महत्त्वाचे असले तरी पाकिस्तानचा संघ हे आव्हान पेलू शकेल.

-सर्फराज अहमद, पाकिस्तानचा कर्णधार

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 26, 2019 1:01 am

Web Title: pakistan match with new zealand
Next Stories
1 ड्रोनच्या नजरेतून : वेगाला मर्यादा!
2 सीमारेषेबाहेर : डा वी  आ घा डी !
3 चर्चा तर होणारच.. : #एक दिवस मुलांसाठी
Just Now!
X