बीसीसीआयच्या दबावानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड एक पाऊल मागे येण्याच्या तयारीत असल्याचं दिसतंय. वर्षाच्या मध्यावधीत होणाऱ्या आशिया चषकाचं यजमानपद यंदा पाकिस्तानकडे देण्यात आलं होतं. मात्र भारतीय संघाने पाकिस्तानात खेळण्यास नकार दिल्यामुळे, गेले काही दिवस वाद सुरु होता. अखेरीस पाक क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष एहसान मणी यांनी, याविषयावर भाष्य करताना नरमाईची भूमिका स्विकारण्यास तयार असल्याचे संकेत दिले आहेत.

“आशियाई क्रिकेट परिषदेशी संलग्न असलेल्या इतर संघांचाही आम्हाला विचार करायचा आहे. इतर देशांचं कोणतही नुकसान व्हायला नको अशी आमची भावना आहे. सर्व सदस्यांचं मत विचारात घेतल्यानंतर स्पर्धेच्या यजमानपदाबद्दल अंतिम निर्णय घेतला जाईल.” पाकिस्तान सुपरलिग स्पर्धेच्या ट्रॉफी अनावरण कार्यक्रमात मणी बोलत होते. काही दिवसांपूर्वी भारत त्रयस्थ ठिकाणी आपले सामने खेळणार अशा बातम्या येत होत्या. पाकिस्तानही आपले यजमानपदाचे हक्क सोडण्यासाठी तयार नव्हतं. मात्र बीसीसीआयने आपली भूमिका ठामपणे ठेवल्यामुळे अखेरीस पाक क्रिकेट बोर्ड एक पाऊल मागे येण्याच्या तयारीत असल्याचं दिसतंय.

काही दिवसांपूर्वी श्रीलंका आणि बांगलादेश या दोन्ही संघांनी पाकिस्तानचा दौरा केला होता. दोन्ही संघांनी पाकिस्तानात कसोटी सामना खेळल्यामुळे, पाकिस्तान आता क्रिकेटसाठी योग्य जागा असल्याचा प्रयत्न पाक क्रिकेट बोर्डाने केला होता. मात्र पाकिस्तान सुपरलिग स्पर्धेच्या आधी, पाकमध्ये बॉम्बस्फोट झाला..ज्यात काही लोकं जखमी झाली होती. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळवण्यासाठी पाकिस्तान सुरक्षित देश असल्याच्या दाव्यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालं. त्यामुळे आगामी काळात या प्रकरणात नेमक्या काय घडामोडी घडतायत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.