गेल्या काही वर्षांपासून भारत आणि पाकिस्तान या दोन पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये क्रिकेटचे सामने खेळवले जात नाहीयेत. आयसीसीच्या स्पर्धा वगळता हे दोन संघ एकमेकांसमोर येत नाहीत, मध्यंतरी काही माजी पाकिस्तानी खेळाडूंनी भारत-पाक क्रिकेट पुन्हा सुरु करण्याची मागणी केली होती. मात्र भारतीय खेळाडूंनी याला नकार दिला होता. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करतो आहे. मात्र आॉस्ट्रेलियाचा माजी गोलंदाज ब्रॅड हॉगच्या मते सध्याचा पाकिस्तानी संघ भारताला त्यांच्यात भूमीवर कसोटी मालिकेत पराभूत करु शकतो.

“भारतीय संघाला कसोटी मालिकेत त्यांच्याच देशात हरवायचं असेल तर माझ्यामते सध्याचा पाकिस्तानी संघ ही कामगिरी करु शकतो. याला काही कारणं आहेत, पहिली गोष्ट म्हणजे सध्याच्या पाकिस्तानी संघात काही चांगले जलदगती गोलंदाज आहेत, फिरकीपटूंचाही पाकिस्तानकडे चांगला भरणा आहे. फलंदातीतही पाकिस्तानी खेळाडू मधल्या फळीपर्यंत चांगली कामगिरी करतात आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ते भारतामधील हवामान आणि खेळपट्ट्यांशी परिचीत आहेत.” एका यु-ट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत हॉगने चाहत्याच्या प्रश्नाला उत्तर दिलं.

मात्र भारत आणि पाकिस्तान यांच्यात सध्या क्रिकेट मालिका खेळवणं अशक्यप्राय असल्याचं लक्षात येताच हॉगने ऑस्ट्रेलियाचा संघही अशी कामगिरी करु शकतो असं म्हटलंय. स्मिथ, वॉर्नर, लाबुशेन असे फलंदाज संघात असताना येत्या काही वर्षांत ऑस्ट्रेलियाचा संघही भारताला त्यांच्यात मैदानात हरवू शकतो. कसोटी मालिकेसाठी पाकिस्तानचा संघ अखेरचा २००७ साली भारतात आला होता, त्यावेळी अनिल कुंबळेच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ती मालिका १-० ने जिंकली होती. १९८६-८७ नंतर पाकिस्तानी संघ भारतात एकही कसोटी मालिका जिंकलेला नाहीये.

अवश्य वाचा – जगातलं तिसरं मोठं क्रिकेट मैदानही भारतात, कामाला सुरुवात