पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) शुक्रवारी आगामी इंग्लंड आणि वेस्ट इंडीज दौर्‍यासाठी कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० संघांची घोषणा केली. यात पॉवर हिटर आझम खानची प्रथमच टी-२० संघात निवड झाली आहे. पाकिस्तान इंग्लंडविरुद्ध ३ तर आणि वेस्ट इंडीजविरूद्ध ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. त्यामुळे आझम आता पाकिस्तान संघात फिनिशरची भूमिका साकारणार आहे.

राष्ट्रीय संघात निवड होणे, हे आझम खानसाठी अजिबात सोपे नव्हते. आझम हा पाकिस्तानचे माजी यष्टीरक्षक-फलंदाज मोईन खान मुलगा आहे. गेल्या पीएसएल मोसमापासून पाकिस्तान संघाच्या निवडकर्त्यांचे आझमकडे लक्ष होते. पहिल्याच चेंडूपासून हाणामारी करण्यासाठी आझम ओळखला जातो. पीएसएल २०२१च्या पहिल्या टप्प्यात आझम खानने खालच्या फळीत फलंदाजीला येऊन पाच सामन्यांत १४४च्या स्ट्राईक रेटने ९८ धावा केल्या. मागील हंगामात आझमने ९ सामन्यांत १३०च्या स्ट्राईक रेटने १५० धावा केल्या. २२वर्षीय आझम खानच्या या कामगिरीमुळे निवडकर्ते खुष झाले आहेत.

हेही वाचा – टीम इंडियाच्या लाडक्या ‘भज्जी’नं किचनमध्ये केली कमाल..! पाहा व्हिडिओ

आझम खानने पाकिस्तान सुपर लीगमध्ये क्वेटा ग्लेडिएटर्सचे प्रतिनिधित्व केले होते आणि सध्या तो अबूधाबीत आहे. पीएसएलचा दुसरा टप्पा ९ जूनपासून सुरू होईल. आझम खानने आतापर्यंत फिनिशरची भूमिका साकारली आहे इंग्लंड आणि वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेपूर्वी आत्मविश्वास वाढावा, अशी त्याची इच्छा आहे. भारतीय संघात धोनीची जी फिनिशरची भूमिका होती, तीच भूमिका आझमची पाकिस्तान संघात आहे. त्यामुळे पाकिस्तानला त्यांचा धोनी मिळाला, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

हेही वाचा – ३६ वर्षीय दिनेश कार्तिकला खेळायचेत दोन टी-२० वर्ल्डकप!

आझमची क्रिकेट कारकीर्द

आझमने आतापर्यंत ३६ टी-२० सामने खेळले आहेत, ज्यात त्याने १५७.४१च्या स्ट्राइक रेटने ७४३ धावा केल्या आहेत. यात चार अर्धशतकांचा समावेश आहे. टी-२० करियरमध्ये त्याने आतापर्यंत ४५ षटकार आणि ६७ चौकार ठोकले आहेत.