पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज नसीम शाहला पाकिस्तान सुपर लीगमधून बाहेर ठेवण्यात आले आहे. पीसीबीचा करोनाबाबत प्रोटोकॉल तोडल्याबद्दल नसीम शाह दोषी आढळला आहे. वास्तविक, नसीम शाह जुन्या आरटीपीसीआर चाचणी अहवालासह लाहोरमधील टीम हॉटेलमध्ये पोहोचला. पीसीबीने सर्व खेळाडूंना ४८ तासांपूर्वीचे अहवाल मागितण्यास सांगितले होते, परंतु नसीम शाहने तसे केले नाहीत. ६ दिवसांचा जुना अहवाल घेऊन नसीम हॉटेलमध्ये दाखल झाला, त्यानंतर त्याला त्वरित आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले.

नसीमच्या या कृत्यानंतर तो अबुधाबीला जाऊ शकणार नाही, असा निर्णय तीन सदस्यांच्या चौकशी समितीने घेतला. नसीममुळे पीएसएलमध्ये खेळणारे अन्य खेळाडू आणि संपूर्ण स्पर्धा धोक्यात येऊ शकते. नसीम शाह क्वेटा ग्लेडिएटर्सचा वेगवान गोलंदाज आहे, स्पर्धेबाहेर झाल्याने आता संघाला मोठा धक्का बसला आहे.

 

कोविड प्रोटोकॉलचे उल्लंघन सहन करणार नाही – पीसीबी

नसीम शाह पीएसएलमधून बाहेर पडल्यानंतर पीसीबीने एक निवेदन जारी केले. पीसीबीचे अधिकारी बाबर हमीद म्हणाले, “पीसीबीला नसीम शाहला काढून टाकण्यात आनंद झालेला नाही, परंतु जर आम्ही या उल्लंघनाकडे दुर्लक्ष केले, तर यामुळे संपूर्ण स्पर्धा धोक्यात येईल. आम्ही नसीम शाहला थेट संदेश दिला आहे, की पीसीबी कोणत्याही प्रकारचे उल्लंघन सहन करणार नाही. या प्रकरणात, आम्हाला सर्व संघ आणि खेळाडूंचे सहकार्य आवश्यक आहे.”

वयाच्या १६व्या वर्षी कसोटी पदार्पण

नसीम शाह हा क्वेटा ग्लेडिएटर्सचा एक महत्त्वाचा गोलंदाज होता. त्याने वयाच्या १६व्या वर्षी ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर कसोटी पदार्पण केले. यानंतर त्याने बांगलादेशविरुद्ध रावळपिंडी कसोटीत हॅट्ट्रिकही केली. पाकिस्तानकडून नसीमने ९ कसोटी सामन्यांमध्ये २० बळी घेतले आहेत.

हेही वाचा – माय-लेकाचा क्रिकेट सामन्यात धुमाकूळ..! शतकी भागीदारी रचत संघाला जिंकवलं