पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमद हा सध्या आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत होता. त्याने वर्णभेदी टिपण्णी केल्याने त्याच्यावर टीका झाली होती. या प्रकरणी त्याच्यावर ICC ने ४ सामन्याच्या बंदीची कारवाईही केली. त्यातच आता पाकिस्तानचा क्रिकेटपटू फखर झमानने मैदानात शिवी घातल्याचे दिसून आले आहे.

पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिके यांच्यात सध्या एकदिवसीय मालिका सुरु आहे. पाचव्या एकदिवसीय सामन्यात फखर आणि बाबर आझम हे दोघे फलंदाजी करत होते. त्यावेळी पाकिस्तानची अवस्था १ बाद ६० अशी होती. त्यावेळी कागिसो रबाडाच्या चेंडूवर फखरला चेंडू समजला नाही. रबाडाचा चेंडू वेगाने येईल असा अंदाज असताना चेंडू संथ आला. चेंडू न समजल्याने तो चेंडू फखरच्या खांद्याला लागला. त्यानंतर फखरने आक्षेपार्ह शब्द वापरल्याचे स्टंप माइकमध्ये कैद झाले.

दरम्यान, आधी पहिल्या एकदिवसीय सामन्यात अहमदने फेलुक्वायोवर वर्णद्वेषी टीका केली होती. २०४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आफ्रिकेचे आघाडीचे फलंदाज अपयशी ठरले होते. ५ बाद ८० अशी आफ्रिकेची अवस्था झाली होती. पण त्यानंतर डुसेर आणि फेलुक्वायो यांनी आफ्रिकेला विजय मिळवून दिला होता.