विराट कोहलीच्या भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकत ऐतिहासीक कामगिरीची नोंद केली आहे. 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ 2-1 ने विजयी ठरला. ऑस्ट्रेलियाला त्यांच्यात भूमीमध्ये हरवणारा भारत हा पहिला आशियाई देश ठरला आहे. या कामगिरीनंतर भारतीय संघावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. यामध्येच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनीही भारतीय संघाचं कौतुक केलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन इम्रान खान यांनी भारतीय संघाचं अभिनंदन केलं आहे.

कसोटी मालिकेत बाजी मारल्यानंतर भारतीय संघ आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध 3 वन-डे सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी बीसीसीआयने जसप्रीत बुमराहला विश्रांती दिली असून, मोहम्मद सिराजला संघात स्थान देण्यात आलं आहे. त्यामुळे आगामी वन-डे मालिकेत भारतीय संघ कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.