सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांचं कारण देत पाकिस्तानसोबत क्रिकेट मालिका खेळण्यास भारतीय संघाने नकार दिला आहे. आयसीसीच्या स्पर्धा वगळता हे संघ समोरासमोर येत नाहीत. गेल्या काही महिन्यांत शोएब अख्तर, रमीझ राजा, शाहिद आफ्रिदी यासारख्या माजी खेळाडूंनी भारत-पाकिस्तान मालिका पुन्हा सुरु होण्याची गरज असल्याचं म्हटलं होतं. भारतीय खेळाडूंनी यावर प्रतिक्रिया देताना हे शक्य नसल्याचं सांगितलं. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारत-पाक मालिकेवर आपलं मत देताना, नाव न घेता भारत सरकारला टोला लगावला आहे.

अवश्य वाचा – “आम्ही तुमच्याकडे खेळायला आलो, आता…”

“ज्यावेळी भारतीय संघ २००५ साली पाकिस्तान दौऱ्यावर आला होता त्यावेळीही वातावरण काहीसं तणावाचंच होतं. दोन्ही बाजूने प्रयत्न सुरु होते. क्रिकेटच्या मैदानावर त्यावेळी जे घडलं त्यावर माझा विश्वासच बसत नव्हता. पाकिस्तानचा संघ घरच्या मैदानावर भारताविरुद्ध हरला. पण असं झाल्यानंतरही उपस्थित प्रेक्षकांनी भारतीय संघाचं कौतुक केलं, ते वातावरण खूप आश्वासक होतं. सध्या (भारतात) ज्या विचारांचं सरकार आहे ते पाहता क्रिकेटच्या मैदानावरचं वातावरण हे भयंकर असेल.” इम्रान खान Sky Sports वाहिनीवरील Out of Exile या डॉक्युमेंट्रीमध्ये बोलत होते.

अवश्य वाचा – आम्हाला आऊट कर पण मारु नकोस, भारताचे फलंदाज माझ्याकडे विनंती करायचे – शोएब अख्तर

काही दिवसांपूर्वी करोनाविरुद्ध लढ्यात निधी उभारण्यासाठी भारत-पाक यांच्यात क्रिकेट मालिका खेळवावी असा पर्याय माजी गोलंदाज शोएब अख्तरने सुचवला होता. परंतू भारतीय खेळाडूंनी याला नकार दर्शवला होता. सध्या बीसीसीआय आयपीएलच्या तेराव्या हंगामाचं आयोजन करण्याच्या तयारीत आहे. वर्षाअखेरीस भारतीय संघ ऑस्ट्रेलियात आपली पहिली कसोटी मालिका खेळेल. पाकिस्तान संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे.

अवश्य वाचा – धोनीने निवृत्तीचा निर्णय मैदानावर घ्यायला हवा होता : इंझमाम उल-हक