थरार, दडपण, उत्साह, रोमांच यांचे नाटय़.. प्रत्येक चेंडूनंतर बदलली जाणारी समीकरणे.. क्षणाक्षणाला सामन्याचे झुकणारे पारडे.. आशा-निराशेच्या हिंदोळ्यावर झुलणारे चाहते.. उडय़ा मारत आनंद साजरा करणारे, दात-ओठ खात खुन्नस देणारे आणि डोक्यावर हात मारून चेहऱ्यावरील निराशा न लपवू शकणारे खेळाडू, अशा अद्भुत वातावरणात पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तानचा सामना आशिया चषक स्पर्धेत रंगला. भारताने रोहित शर्मा, अंबाती रायुडू आणि रवींद्र जडेजा यांच्या अर्धशतकांच्या जोरावर प्रथम फलंदाजी करताना २४५ धावा फटकावल्या होत्या, तरी त्या या अटीतटीच्या सामन्यात कमीच वाटत होत्या. पाकिस्तानने झोकात सुरुवात केल्यावर तर भारतीयांच्या आशा संपल्या होत्या. पण ठरावीक फरकाने पाकिस्तानचे फलंदाज बाद होत गेल्याने भारताने पुन्हा सामन्यावर पकड घट्ट केली. या थरारक सामन्यात शांतचित्ताने खेळत राहण्याचे कसब असलेल्या मोहम्मद हफिझने केलेली ७५ धावांची जबरदस्त खेळी आणि अखेरच्या षटकांमध्ये हाणामारीसाठी जगप्रसिद्ध असलेल्या शाहिद आफ्रिदीच्या तडाखेबंद फटक्यांच्या जोरावर पाकिस्तानने भारतावर १ विकेट आणि दोन चेंडू राखून विजय मिळवला. महत्त्वपूर्ण अर्धशतकी खेळी, दोन बळी आणि दोन झेल अशी अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या हफिझला या वेळी सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
भारताच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानने ७१ धावांची जलदगती सलामी दिली. पण त्यानंतर आतापर्यंत संघात पर्यटक असलेल्या लेग-स्पिनर अमित मिश्राने संधीचा फायदा उचलत भारताला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर पाकिस्तानच्या फलंदाजांनी तंबूत परतण्याची घाई दाखवली आणि त्यांची ४ बाद ११३ अशी अवस्था झाली. पण त्यानंतर हफिझ आणि शोएब मकसूद (३८) यांनी पाचव्या विकेटसाठी ८७ धावांची भागीदारी रचत संघाला स्थैर्य मिळवून दिले. पण संघाने दोनशे धावांचा पल्ला गाठला आणि अश्विनने हफिझचा काटा काढला, त्याने शांतपणे पाकिस्तानची पडझड थांबवत ३ चौकार २ षटकारांच्या जोरावर ७५ धावा केल्या. हफिझ बाद झाल्यावर शाहिद आफ्रिदी आला आणि त्याने मकसूदला धावबाद करण्यात मोलाचा वाटा उचलला. पण या चुकीची त्याने सव्याज परतफेड केली. आर. अश्विनच्या अखेरच्या षटकात त्याने दोन षटकार लगावत संघाला रोमांचकारी विजय मिळवून दिला. आफ्रिदीने १८ चेंडूंत २ चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर नाबाद ३४ धावांची अफलातून खेळी साकारली.
तत्पूर्वी, पाकिस्तानने नाणेफेक जिंकत भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले आणि या रणनीतीमध्ये त्यांना बऱ्यापैकी यश मिळाले. भारताला १८ धावांवर पहिला धक्का दिल्यावर कर्णधार आणि संघाचा आधारस्तंभ विराट कोहली (५) फलंदाजीला आला, पण त्यानेही निराशा केली. पण आतापर्यंत लय न सापडलेल्या रोहित शर्माने एका बाजूने पाकिस्तानच्या गोलंदाजांवर हल्लाबोल सुरू ठेवला होता. ४४ चेंडूंमध्ये रोहितने २२व्या अर्धशतकाला गवसणी घातली. रोहित आता मोठय़ा खेळीच्या दिशेने कूच करेल, असे वाटत असतानाच त्याला बाद करण्याच पाकिस्तानला यश आले. रोहितने ७ चौकार आणि २ षटकारांच्या जोरावर ५६ धावांची खेळी साकारली. भारताचा डाव ४ बाद १०३ असा अडचणीत सापडला असताना आतापर्यंत छाप न पाडलेल्या अंबाती रायुडूने भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. अंबातीने एकेरी-दुहेरी धावांची भर घालत संघाचा धावफलक हलता ठेवला, पण जेव्हा संघाला धावसंख्या फुगवण्याची गरज होती तेव्हा मात्र त्याला काहीच करता आले नाही. अंबातीने ४ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ५८ धावांची खेळी साकारली. अंबातीनंतर भारताची सूत्रे जडेजाने हातामध्ये घेतली. अखेरच्या षटकांमध्ये उमर गुलच्या षटकांमध्ये धावा लुटत त्याने भारताला २५४ धावांपर्यंत मजल मारून दिली. जडेजाने ४ चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर नाबाद ५२ धावांची खेळी साकारली. भारताच्या तीन फलंदाजांनी अर्धशतक झळकावले असले तरी त्यांना मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले.
हफिझ आणि अजमल यांनी मात्र भारताच्या फलंदाजांवर चांगलाच अंकुश ठेवला होता. पदार्पण करणाऱ्या मोहम्मद तालाने भेदक मारा करत भारताच्या दोन फलंदाजांना २२ धावांमध्ये बाद केले.

धावफलक
भारत : रोहित शर्मा झे. हफिझ गो. ताला ५६, शिखर धवन पायचीत गो. हफिझ १०, विराट कोहली झे. अकमल गो. गुल ५, अजिंक्य रहाणे झे. हफिझ गो. ताला २३, अंबाती रायुडू झे. अन्वर अली गो. अजमल ५८, दिनेश कार्तिक झे. अजमल गो. हफिझ २३, रवींद्र जडेजा नाबाद ५२, आर. अश्विन यष्टिचित अकमल गो. अजमल ९, मोहम्मद शमी झे. मकसूद गो. अजमल ०, अमित मिश्रा नाबाद १, अवांतर (लेग बाइज ३, वाइड ५) ८, एकूण ५० षटकांत ८ बाद २४५.
बाद क्रम : १-१८, २-५६, ३-९२, ४-१०३, ५-१५५, ६-२१४, ७-२३७, ८-२३७.
गोलंदाजी : मोहम्मद हफिझ ९-०-३८-२, उमर गुल ९-०-६०-१, जुनैद खान ७-०-४४-०, शाहिद आफ्रिदी ८-०-३८-०, मोहम्मद ताला ७-१-२२-२, सइद अजमल १०-०-४०-३.
पाकिस्तान : शरजील खान त्रि. गो. अश्विन २५, अहमद शेहझाद झे. अश्विन गो. मिश्रा ४२, मोहम्मद हफिझ झे. कुमार गो. अश्विन ७५, मिसबाह-उल-हक धावचीत १, उमर अकमल झे. जडेजा गो. मिश्रा ४, शोएब मकसूद धावचीत ३८, शाहिद आफ्रिदी नाबाद ३४, उमर गुल झे. रहाणे गो. कुमार १२, मोहम्मद ताला झे. जडेजा गो. कुमार ०, सइद अजमल त्रि. गो. अश्विन ०, जुनैद खान नाबाद १, अवांतर (लेग बाइज ११, वाइड ६) १७, एकूण ४९.४ षटकांत ९ बाद २४९.
बाद क्रम : १-७१, २-९३, ३-९६, ४-११३, ५-२००, ६-२०३, ७-२३५, ८-२३६, ९-२३६.
गोलंदाजी : भुवनेश्वर कुमार १०-०-५६-२, मोहम्मद शमी १०-०-४९-०, आर. अश्विन ९.४-०-४४-३, रवींद्र जडेजा १०-१-६१-०, अमित मिश्रा १०-०-२८-२.
सामनावीर : मोहम्मद हफिझ.