पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आज सोमवारी आगामी टी-२० वर्ल्डकपसाठी १५ सदस्यीय संघाची घोषणा केली. बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघ आगामी टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत आव्हान सादर करेल. आसिफ अली आणि खुशदिल शाह वर्ल्डकप संघात परतले आहेत. त्याचबरोबर मोहम्मद आमिर सारख्या खेळाडूंना संघाबाहेर करण्यात आले आहे. संघाच्या घोषणेनंतर संघाचा मुख्य प्रशिक्षक मिसबाह उल हक आणि गोलंदाजी प्रशिक्षक वकार युनूस आपल्या पदावरून पायउतार झाले आहेत.

फखर जमान, शाहनवाज दानी आणि उस्मान कादिर यांचा राखीव खेळाडू म्हणून संघात समावेश करण्यात आला आहे. पुढील महिन्यात टी-२० वर्ल्डकप सुरू होईल. २४ ऑक्टोबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना खेळला जाणार आहे. वर्ल्डकपपूर्वी पाकिस्तान संघ २५ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर दरम्यान न्यूझीलंडविरुद्ध पाच टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी सकलेन मुश्ताक आणि अब्दुल रझ्झाक हे संघाचे प्रशिक्षक असतील. न्यूझीलंडनंतर पाकिस्तान संघ १३ आणि १४ ऑक्टोबर रोजी इंग्लंडविरुद्ध दोन टी-२० सामन्यांची मालिका खेळेल. न्यूझीलंड आणि इंग्लंड दौऱ्यासाठीही हाच संघ असणार आहे.

 

हेही वाचा – T20 World 2021 : १५ खेळाडूंचा समावेश असणारा भारतीय संघ निश्चित; कसोटी संपताच घोषणेची शक्यता

आसिफ अली आणि खुशदिल शाह टी-२० वर्ल्डकप संघात परतले आहेत. आसिफबद्दल बोलायचे झाले तर त्याने या वर्षी फेब्रुवारीमध्ये पाकिस्तान संघाच्या टी-२० संघात पुनरागमन केले. २०१९ नंतर, त्याने या वर्षी फेब्रुवारीमध्ये टी-२० क्रिकेटमध्ये पाकिस्तान संघाचे प्रतिनिधित्व केले. या वर्षी आतापर्यंत तो पाकिस्तानसाठी फक्त चार सामने खेळला. ज्यात त्याने एकूण १३ धावा केल्या. दुसरीकडे, खुशदिलने या वर्षी पाकिस्तानसाठी दोन टी-२० सामने खेळले, ज्यात त्याने २७ धावा केल्या.

 

पाकिस्तान संघ:

बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान, आसिफ अली, खुशदील शाह, मोहम्मद हफीज, शोएब मकसूद, आझम खान, इमाद वसीम, मोहम्मद नवाज, मोहम्मद वसीम, शाहदाब खान, हसन अली, हरीस रौफ, मोहम्मद अफस्नैन, शाहीन नायफ.

राखीव खेळाडू: फखर जमान, उस्मान कादिर, शाहनवाज दानी.