भारताला त्यांच्याच मातीत पराभूत करून मायदेशी परतलेल्या पाकिस्तानच्या संघाचे त्यांचा चाहत्यांनी जल्लोषात स्वाग केले. मंगळवारी पाकिस्तानचा संघ चषकासह लाहोरच्या अलामा इक्बाल आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाला तेव्हा दुतर्फा चाहत्यांनी गर्दी केली होती. यावेळी चाहत्यांनी घोषणा देत पाकिस्तानच्या खेळाडूंचे अभिनंदन केले.
२००५ सालानंतर पहिल्यांदाच पाकिस्तानचा संघ भारतात मालिका खेळण्यासाठी होता. २००५ साली पाकिस्तानने सहा सामन्यांची मालिका ४-२ अशी जिंकली होती, तर यावेळी ट्वेन्टी-२० दोन सामन्यांची मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवली, तर तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका २-१ अशी जिंकली.
पाकिस्तानचा संघ विमानतळावरून बाहेर पडताना त्यांच्यावर गुलाबांच्या पाकळ्यांचा वर्षांव करण्यात आला. त्याचबरोबर संघातील सदस्यांशी हस्तांदोलन करण्यासाठी बऱ्याच जणांनी प्रयत्न केला.
विजयाचे श्रेय संघातील युवा खेळाडूंचे जाते, एकंदरीत कामगिरीवर मी खूष आहे, असे मत यावेळी पाकिस्तानचा एकदिवसीय संघाचा कर्णधार मिसबाह-उल-हक याने व्यक्त केले.
पाकिस्तानचा ट्वेन्टी-२० संघाचा कर्णधार असलेला मोहम्मद हफिझ यावेळी म्हणाला की, हा माझ्यासाठी अभिमानाचा क्षण आहे, हा विजय मी देशाला आणि देशवासियांना समर्पित करतो.पाकिस्तानने भारतात येऊन आतापर्यंत तीन दौरे केले आहे. पाकिस्तानने पहिला दौरा १९८७ साली केली होता, तर दुसरा दौरा २००५ साली केला होता. पाकिस्तानने भारतात यजमानानांविरूद्ध ३० सामने खेळले असून त्यापैकी १९ सामने त्यांनी जिंकले आहेत, तर भारताला ११ सामने जिंकता आले आहेत.