भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हॉकी कसोटी मालिका रद्द करण्यात आल्यानंतर आता पाकिस्ताननेही भारतावर दबाव आणण्यास सुरुवात केली आहे. भारतात डिसेंबरमध्ये होणाऱ्या ज्युनियर विश्वचषक हॉकी स्पर्धेतून माघार घेण्याची धमकी पाकिस्तानने दिली आहे.
‘‘भारताबरोबर खेळाच्या साहाय्याने चांगले संबंध निर्माण करावेत यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत, मात्र अनेक वेळा उभय देशांमधील मालिका रद्द करण्यात आल्या आहेत. हॉकी इंडिया लीगमध्ये आमचे खेळाडू सहभागी झाले होते, मात्र त्यांना एकही सामना न खेळताच मायदेशी परत पाठविण्यात आले. आम्ही खूप काही सहन केले आहे. आता मात्र असे वारंवार होत राहिल्यास आम्ही विश्वचषक स्पर्धेवर बहिष्कार घालणार आहोत,’’ असे पाकिस्तान हॉकी महासंघाचे सरचिटणीस आसिफ  बाजवा यांनी सांगितले.
पाकिस्तानचा संघ एप्रिलमध्ये भारतात पाच कसोटी सामने खेळणार होता व त्यानंतर भारतीय संघ पाकिस्तानमध्ये जाऊन पाच कसोटी सामने खेळणार होता. मात्र पाकिस्तानमधील अतिरेक्यांनी श्रीनगरमध्ये जवानांच्या छावणीवर हल्ला करून जवानांना ठार केले होते. त्यामुळे केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाने कसोटी मालिका भारतात आयोजित करण्यास परवानगी नाकारली होती.
बाजवा म्हणाले, ‘‘दोन्ही संघांमध्ये पुन्हा सामने सुरू व्हावेत, यासाठी आम्ही आता पुढाकार घेणार नाही. जर भारताला उभय देशांमधील संबंध सुधारण्याची इच्छा असेल तर त्यांनी असे सामने आयोजित करण्यासाठी पुढाकार घ्यावा व हे सामने निश्चित होतील अशी काळजी घ्यावी. आम्ही भारतात सामने खेळण्यास केव्हाही तयार आहोत.’’