पाकिस्तानचा पहिल्या डावात १८१ धावांत खुर्दा; ऑलिव्हरचे सहा बळी

आफ्रिका-पाकिस्तान कसोटी मालिका

सेंच्युरियन : वेगवान गोलंदाज डुआन ऑलिव्हरची भेदक गोलंदाजी व त्याला अनुभवी डेल स्टेन व कगिसो रबाडा यांच्याकडून लाभलेल्या सुरेख साथीच्या बळावर दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानचा पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यातील पहिल्या डावात अवघ्या १८१ धावांत खुर्दा केला. प्रत्युत्तरात पाकिस्ताननेही दिवसअखेर आफ्रिकेची ५ बाद १२७ धावा अशी अवस्था केली असून आफ्रिका अद्याप ५४ धावांनी पिछाडीवर आहे.

कारकीर्दीतील अवघा पाचवा कसोटी सामना खेळणाऱ्या २६ वर्षीय ऑलिव्हरने अवघ्या ३७ धावांत सहा बळी पटकावत पाकिस्तानी फलंदाजांचे कंबरडे मोडले. बाबर आझम (७१) वगळता एकालाही संयम बाळगता आला नाही. त्यामुळे पाकिस्तानचा डाव ४७ षटकांत १८१ धावांवर संपुष्टात आला. रबाडाने तीन व स्टेनने एक बळी घेत ऑलिव्हरला चांगली साथ दिली.

प्रत्युत्तरात मोहम्मद आमिर व शाहीन आफ्रिदी यांच्यापुढे आफ्रिकन फलंदाजांचीदेखील तारांबळ उडाली. कर्णधार फॅफ डय़ूप्लेसिस (०) व हाशिम अमला (८) लवकर बाद झाले, तर डीन एल्गरही २२ धावाच करू शकला. तेम्बा बवुमाने नाबाद ३८ धावा करत एक बाजू लावून धरली आहे. त्याच्यासह स्टेन १३ धावांवर नाबाद खेळत आहे.

स्टेनचा सर्वाधिक बळींचा विक्रम

आफ्रिकेच्या डेल स्टेनने बुधवारी फखर झमानला बाद करताच विक्रमाची नोंद केली. आफ्रिकेतर्फे सर्वाधिक कसोटी बळी मिळवणाऱ्या खेळाडूंच्या यादीत स्टेनने प्रथम क्रमांक मिळवला. स्टेनच्या नावावर आता ८९ कसोटींत ४२२ कसोटी बळी जमा असून त्याने शॉन पोलॉकला मागे टाकले.

संक्षिप्त धावफलक

’ पाकिस्तान (पहिला डाव) : ४७ षटकांत सर्वबाद १८१ (बाबर आझम ७१; डुआन ऑलिव्हर ६/३७, कगिसो रबाडा ३/५९).

’ दक्षिण आफ्रिका (पहिला डाव) : ३६ षटकांत ५ बाद १२७ (तेम्बा बवुमा खेळत आहे ३८, डीन एल्गर २२; मोहम्मद आमिर २/२६).