श्रीलंकेची ५ बाद २०२ धावांपर्यंत मजल; नसीम शाहची प्रभावी गोलंदाजी

रावळपिंडी : सलामीवीर दिमुथ करुणारत्ने (५९) आणि ओशादा फर्नाडो (४०) या दोघांनी केलेल्या दमदार सुरुवातीनंतर १६ वर्षीय नसीम शाह आणि अन्य गोलंदाजांनी प्रभावी गोलंदाजीच्या बळावर पुनरागमन केल्यामुळे पाकिस्तानने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवसावर वर्चस्व गाजवले.

तब्बल १० वर्षांनंतर पाकिस्तानात आयोजित करण्यात आलेल्या या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसअखेर श्रीलंकेने ५ बाद २०२ धावा केल्या असून धनंजय डिसिल्व्हा ३८, तर निरोशान डिक्वेला ११ धावावंर खेळत आहे. अंधुक सूर्यप्रकाशामुळे २२ षटकांचा खेळ वाया गेला.

रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर सुरू असलेल्या या लढतीत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेचा कर्णधार करुणारत्ने आणि फर्नाडो यांनी ९६ धावांची सलामी दिली. शाहीन आफ्रिदीने करुणारत्नेला बाद करून ही जोडी फोडली, तर नसीमने फर्नाडोला माघारी पाठवले. परंतु त्यानंतर श्रीलंकेचा डाव ४ बाद १२७ असा घसरला.

संक्षिप्त धावफलक

श्रीलंका : ६८.१ षटकांत ५ बाद २०२ (दिमुथ करुणारत्ने ५९, ओशादा फर्नाडो ४०; नसीम शाह २/५१)

चाहत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि कडेकोट सुरक्षा

२००९ मध्ये श्रीलंकन खेळाडूंवर झालेल्या अतिरेक्यांच्या जीवघेण्या हल्ल्यानंतर प्रथमच पाकिस्तानात आंतरराष्ट्रीय कसोटीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे पाकिस्तान-श्रीलंका यांच्यातील पहिल्या दिवसाचा खेळ पाहण्यासाठी चाहत्यांची मोठय़ा प्रमाणावर गर्दी पाहायला मिळाली. स्टेडियमपासून खेळाडूंच्या हॉटेलपर्यंतही सशस्त्र पोलिसांची कडेकोट सुरक्षाव्यवस्था होती. एरव्ही वाहतूक कोंडीमुळे गजबजणाऱ्या स्टेडियमजवळील द्रुतगती मार्गावरही या वेळी बऱ्याच वर्षांनी शांतता पाहायला मिळाली.

प्रकाशझोतातील कसोटीसाठी पाकिस्तानचे बांगलादेशला निमंत्रण

कराची : कराची येथे जानेवारी महिन्यात प्रकाशझोतातील कसोटी सामना खेळण्यासाठी पाकिस्तान क्रिकेट मंडळाने बांगलादेशला निमंत्रित केले आहे. ‘‘आम्ही दोन कसोटी सामन्यांचा प्रस्ताव बांगलादेश क्रिकेट मंडळाकडे पाठवला आहे. यापैकी एक कसोटी ही प्रकाशझोतातील असेल,’’ असे पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी वासिम खान यांनी सांगितले.