पाकिस्तान व येमेन यांच्यात लाहोर येथे बुधवारी होणारा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या पात्रता फेरीचा सामना रद्द करण्यात आला आहे. लाहोरमधील तणावपूर्ण वातावरणामुळे आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाने (फिफा) हा निर्णय घेतला असल्याची माहिती पाकिस्तान फुटबॉल महासंघाने दिली.
लाहोर येथे चर्चवरील झालेल्या हल्ल्यात काही निरपराध नागरिक ठार झाले होते. त्याच्या निषेधार्थ ख्रिश्चन समाजातर्फे गेले दोन दिवस आंदोलन केले जात आहे. त्यामुळे तेथील परिस्थिती अशांत झाली असल्याचे कारण देत पाकिस्तान फुटबॉल संघटकांनी फिफाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली व
तेथील सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला.  पाकिस्तान फुटबॉल महासंघाचे विपणन संचालक सरदार नवीद हैदर यांनी सांगितले की, ‘‘लाहोर येथे २३ मार्च रोजी होणारी ऑलिम्पिकपूर्व पात्रता फेरीची स्पर्धाही पुढे ढकलण्यात आली आहे.  साहजिकच हे सामने आयोजित करण्यासाठी आम्ही खूपच उत्सुक होतो. आम्ही चांगली तयारीही केली होती, मात्र परिस्थितीपुढे आम्ही काहीही करू शकत नाही. येमेनचे खेळाडूही येथे सामना खेळण्यासाठी उत्सुक होते तथापि त्यांची निराशा झाली आहे.’’
या सामन्यासाठी फिफाने नियुक्त केलेले सामना आयुक्त जॉन विंडसर यांनी दोन्ही संघांच्या कर्णधारांच्या सामन्यापूर्वी होणाऱ्या पत्रकार परिषदाही रद्द केल्या. येमेन संघाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या संघातील काही खेळाडूंनी या सामन्यात खेळण्यास विरोध दर्शविला होता.
भारत दुसऱ्या फेरीत
काठमांडू : भारताने नेपाळला गोलशून्य बरोबरीत रोखले आणि विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या पात्रता गटातील दुसऱ्या फेरीत स्थान मिळविले. या दोन संघांमधील पहिल्या सामन्यात भारताने २-० असा विजय मिळविला होता. येथे भारताच्या आक्रमणावर नेपाळच्या बचावरक्षकांनी जोरदार चाली करीत दडपण ठेवले. ५७ व्या मिनिटाला भारताच्या रॉबिनसिंग याने गोलात चेंडू तटविला़  मात्र, पंचांनी हा गोल अमान्य ठरविला. दुसऱ्या फेरीत चाळीस संघांचा सहभाग असेल व या संघांची आठ गटात विभागणी केली जाणार आहे.  हे सामने १२ जूनपासून सुरू होणार आहेत.