05 April 2020

News Flash

आशियाई कुस्ती स्पर्धा : पाकिस्तानच्या कुस्तीपटूंना भारतात प्रवेश

चीनच्या खेळाडूंबाबतचा निर्णय सोमवारी होणार आहे. त्यामुळे त्यांना व्हिसा देण्यात आलेला नाही

(संग्रहित छायाचित्र)

गृहमंत्रालयाकडून हिरवा कंदील; ‘करोना’मुळे चीनच्या खेळाडूंबाबत आज निर्णय

नवी दिल्ली येथे मंगळवारपासून (१८ फेब्रुवारी) सुरू होणाऱ्या आशियाई कुस्ती स्पर्धेसाठी पाकिस्तानच्या खेळाडूंचा व्हिसा भारताकडून मंजूर करण्यात आला आहे. परिणामी, पाकिस्तानचे कुस्तीपटू स्पर्धेत सहभागी होतील. मात्र ‘करोना’ विषाणूच्या संसर्गाच्या भीतीमुळे चीनच्या खेळाडूंचा सहभाग अजून अनिश्चित आहे. चीनच्या खेळाडूंचे भवितव्य सोमवारी (१७ फेब्रुवारी) ठरणार आहे. कारण चीनच्या खेळाडूंना अद्याप भारताकडून व्हिसा मंजूर झालेला नाही. अर्थातच अनेक देशांसह भारतानेही चीनच्या नागरिकांना ‘करोना’च्या भीतीमुळे प्रवेश निषिद्ध केला आहे.

‘‘चीनच्या खेळाडूंबाबतचा निर्णय सोमवारी होणार आहे. त्यामुळे त्यांना व्हिसा देण्यात आलेला नाही. चीनमधील करोनाची भीती हा मोठा चिंतेचा विषय आहे,’’ असे भारताच्या कुस्ती महासंघाचे सहायक सचिव विनोद तोमर यांनी स्पष्ट केले.

पाकिस्तानकडून चार कुस्तीपटूंसह एक प्रशिक्षक आणि एक सामनाधिकारी भारतात होणाऱ्या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. मोहम्मद बिलाल (५७ किलो), अब्दुल रहमान (७४ किलो), तयब रझा (९७ किलो) आणि झामन अन्वर (१२५ किलो) हे चार कुस्तीपटू भारतात येणार आहेत. त्याबरोबरच पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानचा संघ प्रथमच कोणत्याही क्रीडा स्पर्धेत खेळण्यासाठी भारतात येत आहे.

जर भारताने पाकिस्तानच्या खेळाडूंना व्हिसा नाकारला असता तर ‘युनायटेड वर्ल्ड रेसलिंग’ या कुस्तीच्या आंतरराष्ट्रीय महासंघाकडून भारताच्या कुस्ती महासंघावर निलंबनाची कारवाई झाली असती. त्यातच हे वर्ष ऑलिम्पिकचे वर्ष आहे.

जर एखाद्या देशाच्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळण्यास यजमान देशाकडून मज्जाव करण्यात आला तर त्या यजमान देशावर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (आयओसी) कारवाई करते. भारताने गेल्या वर्षी नवी दिल्ली येथे झालेल्या ‘आयएसएसएफ’ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत पाकिस्तानच्या दोन नेमबाजांना व्हिसा नाकारला होता. अखेर भारताचे क्रीडामंत्री किरेन रिजीजू यांना ‘आयओसी’ला लेखी स्पष्टीकरण देऊन व्हिसा नाकारण्यात आला नव्हता हे सिद्ध करावे लागले होते. यंदादेखील पाकिस्तानच्या कुस्तीपटूंना सहभागी करून घ्यावे, अन्यथा कारवाईचा इशारा ‘आयओसी’कडून देण्यात आला होता.

पाकिस्तानच्या सर्व खेळाडूंना शनिवारी व्हिसा मंजूर करण्यात आला. माझी शुक्रवारी क्रीडा मंत्रालयाचे सचिव राधेश्याम जुलानिया यांची भेट झाली आणि त्यांनी लगेचच हे प्रकरण गृहसचिवांकडे पाठवले. अखेर त्यानंतर पाकिस्तानच्या खेळाडूंना व्हिसा मंजूर झाला. या संपूर्ण प्रकरणात भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष नरिंदर बात्रा यांनी मोलाची भूमिका बजावली.

– विनोद तोमर, भारतीय कुस्ती महासंघाचे सहायक सचिव

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 17, 2020 1:12 am

Web Title: pakistan wrestlers enter india abn 97
Next Stories
1 मॅँचेस्टर सिटीवरील बंदी धक्कादायक!
2 हम्पीला विजेतेपदाची आशा; आज हरिकाशी अंतिम लढत
3 लिव्हरपूलला विजयासह २५ गुणांची आघाडी
Just Now!
X