पाकिस्तानचा वेगवान माजी गोलंदाज शोएब अख्तर कायम चर्चेत असतो. करोनाचा धोका सुरू झाल्यापासून तर तो सातत्याने काहीना काही विधानांमुळे चर्चेचा विषय ठरतोय. सुरूवातीला करोनाग्रस्तांच्या मदतीसाठी भारत-पाक सामने भरवण्याचा प्रस्ताव त्याने दिला. त्यानंतर टीम इंडियाचे तळाचे फलंदाज माझ्या गोलंदाजीला घाबरायचे असं एक वक्तव्य त्याने केलं. आता पाकिस्तानच्या एका माजी खेळाडूच्या वक्तव्याबद्दल मुलाखतीत सांगितल्यामुळे तो चर्चेत आला आहे.

क्रिककास्ट या यु-ट्यूब कार्यक्रमात तो बोलत होता. तेव्हा, पाकिस्तान संघातील त्याचा सहकारी मोहम्मद युसुफ याने अख्तरला श्रीलंकेचा फिरकीपटू मुरलीधरन याची बोटं तोडायला सांगितली होती, असा दावा त्याने केला. “मुरलीधरन फलंदाजीस आला की मला युसुफ मुरलीधरनला चेंडू मारायला सांगायचा. ‘मला त्याची फिरकी गोलंदाजी खेळता येत नाही. तू त्याची बोटं तोडून टाक’, असंही तो मला सांगायचा. त्यानंतर एक दोन वेळा मी मुरलीधरनला बाऊन्सर चेंडू टाकून घाबरवलंदेखील होतं. पण तेव्हा मुरलीने मला सांगितलं होतं की असे चेंडू टाकू नको. मला चेंडू लागला, तर मी मरून जाईन”, असा किस्सा अख्तरने सांगितला.

इतर तळाच्या फलंदाजांबाबतही अख्तरने सांगितलं. “मला चेंडू मारू नको असं तळाला फलंदाजी करण्यासाठी येणारे अनेक खेळाडू मला सांगायचे. मुरलीधरनही त्यातलाच एक होता. अनेक भारतीय तळाचे फलंदाज (टेलएंडर) माझ्यापुढ्यात विनवणी करायचे की आम्हाला चेंडू मारू नको, आमच्या घरी आमचं कुटुंब आहे. मुरलीधरन तर मला सांगायचा की तू धीम्या गतीने चेंडू टाक, मी स्वत:तूनच बाद होतो”, असे अख्तरने नमूद केले.