करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा फटका क्रीडा विश्वालाही बसला आहे. तब्बल ४ महिने आंतरराष्ट्रीय क्रिकेट बंद असल्यामुळे अनेक क्रिकेट बोर्डांसमोर सध्या आर्थिक संकट उभं आहे. पाक क्रिकेट बोर्डाचा आपल्या मुख्य प्रायोजक असलेल्या पेप्सी कंपनीसोबतचा करारही संपुष्टात आल्यामुळे, त्यांनी नवीन स्पॉन्सरशीपसाठी निवीदा मागवल्या होत्या. परंतू पेप्सी कंपनीचा अपवाद वगळता एकाही नवीन कंपनीने पाक संघाला स्पॉन्सरशीप देण्यात रस दाखवला नाही. त्यामुळे आपल्या आगामी इंग्लंड दौऱ्यात पाक संघाला शाहिद आफ्रिदी फाऊंडेशनचा लोगो लावून खेळावं लागणार आहे.

अवश्य वाचा – भारत सरकारच्या धोरणांमुळे भारत-पाक क्रिकेट सामने होत नाहीत – PCB अध्यक्ष एहसान मणी

पाकिस्तानी संघ इंग्लंड दौऱ्यात ३ कसोटी आणि ३ टी-२० सामने खेळणार आहे. पण हे सामने पाकिस्तानात प्रक्षेपित केले जाणार नाहीयेत. पाकिस्तानमधील स्थानिक ब्रॉडकास्टर पीटीव्हीने सामन्यांचं प्रक्षेपण करण्यासाठी इंटरनॅशनल ब्रॉडकास्टरकडून आकारली जाणारी रक्कम देण्याइतके पैसे नसल्याचं स्पष्ट केलंय. याआधी सामन्यांची रक्कम पीटीव्हीने इंटरनॅशनल ब्रॉडकास्टर्सना देणं बाकी आहे…त्यामुळे जोपर्यंत ही रक्कम पीटीव्ही देत नाही तोपर्यंत या सामन्यांचं प्रेक्षपण पाकिस्तानात होणार नाही. पाकिस्तान क्रिकेट बोर्डानेही या प्रकरणात आपले हात वर करत पीटीव्हीला स्वतः यातून मार्ग काढण्यास सांगितलं आहे.

एरवी आंतरराष्ट्रीय दौऱ्यावर जाणाऱ्या खेळाडूंची सोय ही पंचतारांकित हॉटेलमध्ये केली जाते. मात्र पाक क्रिकेट बोर्डावर सध्या ओढावलेलं आर्थिक संकट पाहता पाक खेळाडूंवर इंग्लंडमध्ये लॉजवर राहण्याची वेळ आली आहे. पाकिस्तानी क्रीडा पत्रकार साज सादीकने आपल्या ट्विटर हँडलवर याची माहिती दिली आहे.

५ ऑगस्टपासून या मालिकेला सुरुवात होणार असून ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानावर पहिला कसोटी सामना खेळवला जाईल.