पाकिस्ताननं नुकत्याच पार पडलेल्या टी 20 मालिकेमध्ये वेस्ट इंडिजचा 3 – 0 असा पराभव केला आणि आयसीसी क्रिकेट रँकिंगमध्ये पहिलं स्थान राखलं. वेस्ट इंडिजच्या दौऱ्याआधी पाकिस्तान सुपर लीगमध्ये अनेक खेळाडूंना संधी मिळाली. दोन वर्ष या स्पर्धा यशस्वीरीत्या भरवल्यानंतर पाकिस्ताननं आंतरराष्ट्रीय संघांना मायदेशात क्रिकेट खेळायला आमंत्रण दिलं. टी-20 मध्ये पाकिस्तान संघ अव्वल असल्याचं गेल्या काही काळामध्ये दिसून आलेलं आहे. पाकिस्ताननं सलग सात टी-20 मालिका जिंकल्या असून 2009 मध्ये श्रीलंका संघावर झालेल्या हल्ल्यानंतर आता पाकिस्तानातही क्रिकेट पुन्हा मूळ धरू लागल्याचं दिसत आहे.
पाकिस्तानच्या या यशाचं श्रेय पाकिस्तानी संघाचा प्रशिक्षक वकार युनूस यानं पाकिस्तानी खेळाडुंनी आयपीएलमध्ये न खेळण्याला दिलं आहे. वकार म्हणाला की, “आयपीएलमध्ये न खेळल्यामुळे आपल्या खेळाडुंचे पाय जमिनीवर आहेत. त्यांना त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळण्याची इच्छा आहे. ज्यावेळी लहान मुलं क्रिकेट खेळतात तेव्हा ते लाखो रुपये कमावण्याचा विचार नाही करत. तर ते क्रिकेटच्या प्रेमापोटी खेळत असतात.”
तर, आयपीएलमध्ये महत्त्व आहे पैशाला असं सांगताना 20 लाख डॉलर्स कमावण्यासाठी आयपीएलमध्ये खेळाडू जातात, तर पाकिस्तानात 2.5 हजार डॉलर्स मिळतात असं उदाहरण वकारनं दिलं आहे. क्रिकेटमध्ये पैशाला महत्त्व आल्यामुळे क्रिकेटवरील प्रेमापेक्षा पैसा महत्त्वाचा झाला आहे व यास आयपीएल जबाबदार असल्याचा दावा वकारनं केला. मात्र, हेच आयपीएल न खेळल्यामुळे पाकिस्तानी क्रिकेटपटूंचे पाय जमिनीवर राहिल्याचं वकारनं म्हटलं असून हेच पाकिस्तानच्या यशाचं रहस्य असल्याचा दावा त्यानं केला आहे. खेळाडूंचे अग्रक्रम यामुळे बदलत असून यामुळे क्रिकेट तर संपणार नाही ना याची काळजी जागतिक क्रिकेट संघटनांनी घ्यावी असंही वकारनं म्हटलं आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 6, 2018 12:40 pm