पाकिस्तानचा फलंदाज शोएब मलिक याच्या डोक्यात बॉल लागल्याने तो मैदानावर बेशुद्ध पडला. न्यूझीलंडविरुद्ध हॅमिल्टन येथे मंगळवारी झालेल्या चौथ्या एकदिवसीय सामन्याच्यावेळी हा प्रकार घडला. सामन्यातील ३२ व्या षटकात न्यूझीलंडचे फिरकी गोलंदाज मारा करत होते. त्यामुळे मलिक हेल्मेट न घालता मैदानात उतरला होता.

Ind vs SA 2nd Test Centurion Day 4 Live Updates : भारताला मोठा धक्का, विराट कोहली माघारी

यावेळी एक चोरटी धाव घेण्यासाठी मलिक धावला पण त्याचा साथीदार मोहम्मद हफीजने त्याला परत पाठवले. यावेळी पॉईंटवर क्षेत्ररक्षण करणाऱ्या कॉलीन मुनरोने मलिकला बाद करण्यासाठी स्टम्प्सच्या दिशेने चेंडू फेकला. मात्र, हा चेंडू क्रीझमध्ये परतत असलेल्या शोएब मलिकेच्या डोक्याच्या मागच्या बाजूला आदळला. चेंडू डोक्यात लागल्यानंतर शोएब मलिक लगेचच जमिनीवर कोसळला. त्यामुळे सर्वच खेळाडू आणि प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकला. खेळाडू आणि डॉक्टरांनी मलिकच्या दिशेने धाव घेतली. त्यानंतर थोड्यावेळातच मलिक उभा राहिला आणि सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. त्यानंतर शोएब मलिक आणखी चार चेंडूच खेळला आणि सहा धावांवर बाद झाला. त्यानंतर तो क्षेत्ररक्षणासाठीही मैदानात उतरला नाही. चेंडू लागल्यामुळे काही वेळासाठी मलिकची शुद्ध हरपली होती. तो खेळू शकत नव्हता म्हणून क्षेत्ररक्षणासाठी उतरला नाही, अशी माहिती पाकिस्तान क्रिकेट संघाचे फिजियोथेरपिस्ट व्ही. बी. सिंह यांनी दिली. न्यूझीलंडने या सामन्यात पाकिस्तानचा पाच गडी राखून पराभव केला.