पाकिस्तान हॉकी संघटनेची अवस्था सध्या दुष्काळात तेरावा महिना अशी झाली आहे. २०२० साली टोकियो ऑलिम्पिकमध्ये प्रवेश मिळवण्याचं पाकिस्तान हॉकीचं स्वप्न आता हवेत विरण्याची शक्यता आहे. आगामी महिन्यात होणाऱ्या ऑलिम्पिक पात्रता फेरीत आंतरराष्ट्रीय हॉकी संघटनेनेने पाकिस्तानच्या संघाला संधी नाकारली आहे. हॉकी प्रो-लिग स्पर्धेत पाकिस्तान हॉकी संघटनेने आपला संघ पाठवला नसल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचं समजतंय.

आयत्यावेळी स्पर्धेत संघ न पाठवल्यामुळे, आंतरराष्ट्रीय हॉकी संघटनेने पाकिस्तान हॉकी संघाला १ लाख ७० हजार युरोजचा दंड ठोठावला. मात्र आर्थिक गर्तेत सापडलेल्या पाकिस्तान हॉकी संघटनेकडे दंडाचे पैसे भरण्याइतपतही पैसे नाहीयेत. या कारणासाठी दंडाची रक्कम हप्त्यांमध्ये भरण्याची सवलत पाकिस्तान हॉकीला आंतरराष्ट्रीय संघटनेकडे मागावी लागली. मात्र यानंतर वेळ देऊनही दंड न भरल्यामुळे अखेर ही कारवाई करण्यात आलेली आहे.

पाकिस्तान हॉकी संघटनेचे अध्यक्ष आसिफ बाजवा यांनी हा निर्णय आपल्यासाठी मोठा धक्का असल्याचं म्हटलं आहे. आपण आंतरराष्ट्रीय संघटनेच्या अधिकाऱ्यांना निर्णयाचा फेरविचार करण्याची विनंती करणार असल्याचंही बाजवा यांनी स्पष्ट केलं. याचसोबत पाकिस्तान हॉकी संघटनेला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांसोबत चर्चा सुरु असल्याचंही बाजवा म्हणाले.

राष्ट्रीय खेळाचा दर्जा असलेल्या हॉकीची पाकिस्तानमध्ये सध्या वाताहत सुरु आहे. खेळाडूंना त्यांच्या सामन्याचं मानधन देण्याइतपत पैसे पाकिस्तान संघटनेच्या खात्यात नाहीयेत. याचसोबत संघाला प्रशिक्षण देण्यासाठी योग्य उमेदवार संघटनेला मिळत नाहीये. मध्यंतरी रोलांट ओल्टमन्स यांच्याकडे पाक हॉकी संघाची धुरा सोपवण्यात आली होती, मात्र त्यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला. सध्या पाकिस्तान हॉकीच्या खात्यात ७ लाख ६५ हजार रुपये इतकी रक्कम शिल्लक आहे. त्यामुळे भविष्यकाळात पाकिस्तानचा संघ ऑलिम्पिकमध्ये पात्र ठरतो की नाही हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.