व्हिसा आणि प्रायोजकत्वाबाबतचे अडथळे दूर झाल्यामुळे पाकिस्तानी संघाची विश्वचषक हॉकी स्पर्धेतील सहभागाबाबतची अनिश्चितता संपुष्टात आली आहे. त्यामुळे २८ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या हॉकी विश्वचषक स्पर्धेमध्ये पाकिस्तानचा संघ खेळू शकणार आहे.

भारताच्या उच्चायुक्तांकडून पाकिस्तानी संघाला व्हिसा मिळाला. तसेच नवीन प्रायोजकांकडून पाकिस्तानी संघासाठी ९० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. एकूण १६ देश सहभागी होणाऱ्या या स्पर्धेला भारतातील भुवनेश्वरच्या कलिंगा स्टेडियमवर प्रारंभ होणार आहे.

पाकिस्तान हॉकी संघटनेचे सचिव शाहबाझ अहमद यांनी सर्व प्रमुख मुद्दे निकाली निघाले असल्याचे सांगितले. ते म्हणाले, ‘‘अर्थात अद्याप पाकिस्तानचे नवे प्रशिक्षक तौकिर दार आणि साहाय्यक प्रशिक्षक दानिश कलीम यांना भारतीय व्हिसा मिळालेला नाही. त्यांचे अर्ज उशिराने दाखल करण्यात आले आहेत. मात्र भारतीय उच्चायुक्तांकडून त्यांनादेखील लवकरच व्हिसा दिला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.’’

‘‘दोन वर्षांपूर्वी कनिष्ठ विश्वचषकावेळी व्हिसा न मिळाल्याने पाकिस्तानचा संघ भारतात येऊ शकला नव्हता. मात्र आता सारे सुरळीत झाले आहे. पाकिस्तानच्या नवीन प्रायोजकांकडून रक्कमदेखील मिळाली असल्याने लवकरात लवकर विमानाची तिकिटे काढण्यासह खेळाडू आणि पदाधिकाऱ्यांना त्यांच्या रकमादेखील देणे शक्य होणार आहे. त्यामुळे खेळाडू आणि पदाधिकारी संपूर्णपणे खेळावर लक्ष केंद्रित करू शकणार आहेत. अनेक संघांना आमचा संघ आश्चर्यचकित करेल,’’ असा विश्वासही अहमद यांनी व्यक्त केला.