पंढरीनाथ पठारे, कुस्ती मार्गदर्शक

सुप्रिया दाबके

शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार मिळण्यावरून काहींनी टीका केली असली तरी कुस्तीपटूंसाठी सदैव झटत राहणार, अशा शब्दांत पंढरीनाथ पठारे यांनी टीकाकारांना उत्तर दिले आहे. ‘‘पुरस्कार हे मिळत नसतात तर ते मिळवून घेण्यासाठी कर्तृत्व सिद्ध करायचे असते. मी स्वभावाने अतिशय सरळ आणि साधा आहे. पुरस्काराची रक्कमदेखील मी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्याचे जाहीर केले होते. पैलवानांच्या भल्याचाच मी सदैव विचार केला आहे. त्यामुळे कितीही टीका झाली, कितीही आक्षेप घेण्यात आले तरी कुस्तीपटूंसाठीच सदैव झटत राहणार,’’ अशा शब्दांत पंढरीनाथ पठारे यांनी टीकाकारांना सुनावले. जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल ७२ वर्षीय पठारे यांच्याशी केलेली खास बातचीत

* कुस्तीचेआधारस्तंभ अशीच आपली ओळख आहे, त्याविषयी काय सांगाल?

माझा आता दुधाच्या डेअरीचा व्यवसाय आणि शेती आहे. त्यामुळे मदतीसाठी येणाऱ्या कुस्तीपटूंना मी कधीच नाही म्हणत नाही, कारण माझे आयुष्य हे कुस्तीपटूंच्या मदतीसाठीच आहे. पुण्यातील गोकुळ वस्ताद तालमीचे काम १९८५ मध्ये मी हातात घेतले. आता मी गोकुळ तालमीचा आणि काका पवार यांच्या तालमीचा अध्यक्ष आहे. काका पवार, राहुल आवारे, हरिश्चंद्र बिराजदार, अभिजित कटके यांसारख्या अनेक मल्लांना मार्गदर्शन केले. दिवंगत बिराजदार यांच्या कुटुंबीयांना मी तीन बेडरूमची सदनिका भेट म्हणून दिली. ऑलिम्पिकमधील पदक विजेती साक्षी मलिकलाही मी आर्थिक मदत केली. त्याशिवाय महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी विजेत्यांना नेहमीच माझ्याकडून स्वतंत्र बक्षिसे देतो. विविध आखाडय़ांच्या बांधणीसाठी मी आर्थिक मदत केली आहे. त्याशिवाय कुस्तीपटूंचे सत्कार आणि स्पर्धाचे आयोजन हिरिरीने करतो.

* कुस्तीसाठी आपण जी सेवा करत आहात, त्याची सुरुवात नेमकी कशी झाली?

लहानपणी माझ्या खराडी गावातून वारकरी पायी चालत जायचे. माझे वडीलसुद्धा वारकरी संप्रदायातील होते. अर्थातच त्या वारकऱ्यांना थोडेफार काहीतरी खाण्यासाठी द्यावे, अशी माझ्या आईवडिलांची इच्छा असायची. त्यातून इतरांना मदत करण्याचा धडा मी घेतला. कुस्तीद्वारे मी तो जोपासला. माझ्या मोठय़ा मुलाचे गेल्या वर्षी निधन झाले. मात्र त्यानंतरच्या काही दिवसांमध्येही कुस्तीपटूंसाठी मी कार्यरत होतो.

* जीवनगौरव पुरस्काराविषयी काय सांगाल?

मला जीवनगौरव पुरस्कार मिळावा अशी अनेकांची इच्छा होती. त्यामुळे या पुरस्काराने माझा गौरव झाल्याबद्दल आनंद झाला आहे. मी माझे संपूर्ण आयुष्य कुस्तीसाठी दिले. माझे लहानपण पुण्यातील खराडी गावातील गोरगरीब शेतकरी कुटुंबात गेले. मात्र कुस्ती आणि कबड्डीची आवड उपजतच असल्याने घरातल्या भावंडांना बरोबर घेऊन कुस्ती खेळायचो. कुस्तीच्या स्पर्धा गाजवल्या नसल्या तरी आयुष्यभर मार्गदर्शक म्हणून काम करण्याचे मी ठरवले. त्याचीच पोचपावती या पुरस्कारामुळे मिळाली आहे.

* कुस्तीपटू म्हणून मैदान गाजवता आले नाही, याची खंत वाटते का?

चांगला कुस्तीपटू होण्यासाठी खुराक महत्त्वाचा असतो. मात्र लहानपणी घरात गरिबी असल्याने अनेक वेळा चांगला खुराक मिळणार कुठून, असा प्रश्न होता. माझी पहिली कुस्ती मी १९६१ मध्ये जिंकली, तेव्हा मला २८५ रुपये मिळाले होते. अर्थातच त्या वेळेला माझ्याकडेच काहीच नव्हते. परिणामी, कुस्तीपटू म्हणून मला मैदाने गाजवता आली नाहीत.

* महाराष्ट्राचा मल्ल ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवेल असे वाटते का?

राहुल आवारेसारखे महाराष्ट्राचे मल्ल ऑलिम्पिकमध्ये पात्र ठरून निश्चितच पदक मिळवतील, याची मला खात्री आहे. कारण महाराष्ट्रात कुस्ती खेळात गुणवत्तेची कमी नाही. कुस्तीपटूंनी वेळेची शिस्त सांभाळून कठोर मेहनत घेतली तर यश मिळतेच.