खेळपट्टी निश्चितीप्रकरणी पुण्याच्या मैदानाचे क्युरेटर पांडुरंग साळगावकर यांची चौकशी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) भ्रष्टाचारविरोधी पथकाचे समन्वयक स्टीव्ह रिचर्डसन पुण्यात दाखल झाले आहेत.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पुण्यात झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यापूर्वी साळगावकर यांनी खेळपट्टीबाबत बेकायदेशीर माहिती दिली होती. हे स्टिंग ऑपरेशन एका खासगी वृत्तवाहिनीच्या दोन पत्रकारांनी केले होते.

‘‘आयसीसीच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाचे अधिकारी रिचर्डसन हे गुरुवारी पुण्यात दाखल झाले आहेत. त्यांच्याबरोबर या सामन्यासाठी नेमलेले आयसीसीच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाचे अधिकारी बिर सिंग यांचाही प्रक्रियेत सहभाग असेल. हे दोघेही साळगावकर यांची चौकशी करतील, पण त्याचबरोबर खासगी वृत्तवाहिनीच्या दोन पत्रकारांशीही चर्चा करणार आहेत,’’ असे बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

या अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, ‘‘सध्याच्या घडीला साळगावकर यांना बीसीसीआय आणि राज्य संघटनेने निलंबित केले आहे. पण याप्रकरणी साळगावकर दोषी असल्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही. रिचर्डसन साळगावकर आणि अन्य व्यक्तींची भेट घेणार आहे. यानंतर ते आपला अहवाल आयसीसीला सादर करतील आणि त्यानंतर आयसीसी याबाबतचा निर्णय घेणार आहे.’’