अहमदाबादमध्ये झालेल्या भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी मॉन्टी पनेसारची निवड न केल्याची चूक इंग्लंडचे प्रशिक्षक अ‍ॅन्डी फ्लॉवर यांनी मान्य केली. पहिल्या डावात ३३० धावांनी पिछाडीवर पडणाऱ्या इंग्लंडने पहिला कसोटी सामना नऊ विकेट्सने गमावला होता. खेळपट्टीबाबतचा माझा अंदाज चुकला, हेही फ्लॉवर यांनी यावेळी सांगितले.
आता शुक्रवारपासून मुंबईत सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लिश संघ सज्ज होत आहे. त्याबाबत फ्लॉवर म्हणाला कीे, ‘‘दुसऱ्या कसोटीसाठी अंतिम संघनिवड करण्यापूर्वी आम्ही आधी खेळपट्टीची पाहणी करू. मुंबईची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना अधिक साथ देईल अशी अपेक्षा आहे. या सामन्यात फक्त इयान बेल खेळू शकणार नाही, हे फक्त निश्चित झालेले आहे.’’
‘‘अहमदाबाद कसोटीत पनेसारला संघात स्थान दिले नाही, ही आमची चूक झाली. खेळपट्टी इतक्या लवकर फिरकीला साथ देईल असे आम्हाला वाटले नव्हते. खेळपट्टीने प्रारंभी दाखविलेली फिरकीची साथ पाहता नंतर ती आणखी अनुकूल होईल असे वाटले होते. पण चौथ्या आणि पाचव्या दिवशीच्या खेळाने मला आश्चर्य वाटले. खेळपट्टीने आमचे सारे अंदाज चुकवले,’’ असे फ्लॉवर यांनी सांगितले. ‘‘वानखेडेच्या खेळपट्टीवर चेंडू अधिक उसळी मारेल. त्यामुळे आमच्या वेगवान गोलंदाजांना त्याचा फायदा होईल. फक्त इंग्लिश संघ ठरविण्यापूर्वी आम्ही खेळपट्टी आधी पाहू. त्यानंतरच मी योग्य निर्णय घेऊ शकेल. खेळपट्टी फिरकीला साथ देणारी असल्यास आम्ही नक्कीच दोन फिरकी गोलंदाजांसह खेळू,’’ असे फ्लॉवरने सांगितले.