22 April 2019

News Flash

अडवाणीचे ३२वे राष्ट्रीय जेतेपद

अडवाणीने ३२व्यांदा राष्ट्रीय सुवर्णपदकावर कब्जा केला.

भारताचा आघाडीचा स्नूकरपटू पंकज अडवाणी याने युवा खेळाडू लक्ष्मण रावत याचा एकतर्फी लढतीत धुव्वा उडवत रविवारी आणखी एका राष्ट्रीय विजेतेपदाची कमाई केली. राष्ट्रीय स्नूकर स्पर्धेचे विजेतेपद पटकावतानाच अडवाणीने ३२व्यांदा राष्ट्रीय सुवर्णपदकावर कब्जा केला.

अडवाणीच्या खात्यात आता ११ कनिष्ठ स्पर्धेची विजेतेपदे, नऊ वेळा बिलियर्ड्सचा राष्ट्रीय विजेता, तीन वेळा ‘सिक्स-रेड’ स्नूकर स्पर्धेचे विजेतेपद आणि नऊ वेळा स्नूकरचा विजेता अशी ३२ राष्ट्रीय विजेतेपदे जमा आहेत. त्याचबरोबर अडवाणीने २१ वेळा जागतिक स्पर्धाची विजेतेपदे पटकावली आहेत. रविवारी झालेल्या अंतिम फेरीवर पूर्णपणे अडवाणीचे वर्चस्व पाहायला मिळाले. अडवाणीने रावतवर ६-० अशी मात केली.

महिलांच्या अंतिम फेरीत, बेंगळुरूचा वर्षां संजीव हिने महाराष्ट्राचा अरांसा सांचीझ हिला ४-२ अशी धूळ चारत राष्ट्रीय विजेतेपदाला गवसणी घातली. वर्षांने उपांत्यपूर्व फेरीत अमी कमानी हिला तर उपांत्य फेरीत विद्या पिल्ले हिचा पराभव करत या स्पर्धेवर वर्चस्व गाजवले.

First Published on February 11, 2019 12:46 am

Web Title: pankaj advani clinches national snooker title