विश्व स्नूकर स्पर्धा

पंधरा वेळा विश्वविजेतेपदाचा मान पटकावणाऱ्या भारताच्या पंकज अडवाणीने दोहा येथे सुरू असलेल्या आयबीएसएफ विश्व स्नूकर अजिंक्यपद स्पध्रेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. पंकजने या कामगिरीसह भारताचे पदकही निश्चित केले आहे. गतविजेत्या पंकजने थायलंडच्या थानावत तिरापोंगपैबूनवर ६-५ असा विजय मिळवला.

थायलंडच्या खेळाडूने उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात पंकजला कडवी टक्कर दिली. ११ फ्रेमच्या या लढतीत पंकजने सुरुवातीला ५-३ अशी आघाडी घेतली होती, परंतु थायलंडच्या खेळाडूने दमदार पुनरागमन केले. सामना ५-५ असा बरोबरीत आणत थानावतने सामना निर्णायक फ्रेमपर्यंत नेला. यामध्येही पंकजने ५६-४५ असा विजय मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित केला. पंकजने ही लढत ६५-३५, ६४(५४)-७५, ५-११३ (१०९), ७५-०, १२०(८९)-१५, ७६(६८)-२०, ६१(४२)-६४(४५), ९८(९७)-०, ४६(४१)-७४(७४), ०-१२०(१२०), ५६-४५ अशी जंकली.

तत्पूर्वी, त्याने पाकिस्तानच्या बाबर मसीह आणि मलेशियाच्या किन हू मोहम्मदचा पराभव केला. उपउपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत पंकजने मलेशियाच्या खेळाडूविरुद्ध १२६ गुणांच्या ब्रेकची नोंद केली. पंकजने ही लढत १३-६३, १००(६८)-२०, १३३(१२६)-७, ३४-७२, ४४-७३, ८३-२०, ४९-४५, ७०-४३ अशा फरकाने जिंकली.