भारताचा सर्वात सातत्यपूर्ण खेळाडू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंकज अडवाणीने रविवारी आपल्या खात्यात २२व्या जगज्जेतेपदाची भर घातली. आयबीएसएफ जागतिक बिलियर्ड्स अजिंक्यपद स्पर्धेच्या १५०-अप प्रकारात अडवाणीने जगज्जेतेपद पटकावले.

२०१४मध्ये व्यावसायिक स्तरावर पुनरागमन केल्यानंतर ३४ वर्षीय अडवाणीने प्रत्येक वर्षी जगज्जेतेपदाचा चषक भारतात आणला आहे. बिलियर्ड्सच्या या मर्यादित प्रकारात पंकजचे हे गेल्या सहा वर्षांतील पाचवे जगज्जेतेपद ठरले. गेल्या वर्षीप्रमाणेच पंकज अडवाणीने म्यानमारच्या नाय थ्वाय ओ याचा अंतिम फेरीत ६-२ (१५०-४, १५१-६६, १५०-५०, ७-१५०, १५१-६९, १५०-०, १३३-१५०, १५०-७५) असा पराभव केला.

पंकजने १४५, ८९ आणि १२७ गुणांचे ब्रेक लगावत सुरुवातीलाच ३-० अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर थ्वायने एक फ्रेम जिंकून सामन्यात रंगत आणली. पण पंकजने पुढील चारपैकी तीन फ्रेम जिंकून विजेतेपद संपादन केले.

२००३मध्ये पहिले जगज्जेतेपद पटकावल्यानंतर पंकज अडवाणीची विजयी घोडदौड सुरूच आहे. या खेळात सर्वाधिक जगज्जेतेपद पटकावणारा तो जगातील एकमेव स्नूकरपटू ठरला आहे.

बिलियर्ड्सचा हा प्रकार बेभरवशी मानला जात असून सलग चार वर्षे आणि गेल्या सहा वर्षांतील पाचवे जगज्जेतेपद पटकावताना आनंद होत आहे. प्रत्येक वर्षी मी जेव्हा जागतिक स्पर्धेत सहभागी होतो, त्या प्रत्येक वेळी माझा आत्मविश्वास गगनाला भिडलेला असतो. विजेतेपदाची भूक आणि माझे खडतर परिश्रम याचेच हे फळ म्हणावे लागेल.

– पंकज अडवाणी