जपानमध्ये होणाऱ्या टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेसाठी भारतीय पॅरा बॅडमिंटनपटू कृष्णा नागरने आपले तिकिट पक्के केले आहे. एमएएसएच ६ प्रकारातील पुरुष एकेरी स्पर्धेसाठी नागरला ऑलिम्पिक कोटा देण्यात आला आहे. वर्ल्ड बॅडमिंटन फेडरेशनने (बीडब्ल्यूएफ) नागरला ऑलिम्पिक कोटा दिला. राजस्थानच्या जयपूरमध्ये राहणाऱ्या नागरने याबद्दल आनंद व्यक्त केला.

मोठी कामगिरी केल्यानंतर नागर म्हणाला, “ही माझ्यासाठी मोठी कामगिरी आहे. मी गेल्या एक वर्षापासून कठोर परिश्रम केले आहेत आणि टोकियो ऑलिम्पिकचे तिकीट मिळवणे हे माझ्यासाठी स्वप्नासारखेच होते.”

 

२०१८च्या पॅरा एशियन गेम्समध्ये कांस्यपदक जिंकणारा नागर म्हणाला, ”टोकियोमध्ये चांगले निकाल मिळवण्यासाठी मी अजून कठोर परिश्रम घेत आहे. मी लखनऊमध्ये एका प्रशिक्षण शिबिरात जात आहे. शिबिरामध्ये सर्व सुविधा उपलब्ध आहेत आणि मला आशा आहे, की या शिबिराचा मला खूप फायदा होईल.”

पॅरा-बॅडमिंटनपटू तरुण (एसएल ४ ) आणि प्रमोद भगत (एसएल ३) यांनीही आपापल्या गटात पॅरालिम्पिकसाठी पात्रता दर्शवली आहे.