एक हजार गुण मिळवणारा पहिला खेळाडू

कोलकाता : अव्वल चढाईपटू प्रदीप नरवालने प्रो कबड्डी लीगच्या इतिहासात नव्या अध्यायाची नोंद केली. प्रो कबड्डी लीगमध्ये एकूण एक हजार गुणांचा टप्पा गाठणारा तसेच चढायांचेही एक हजार गुण मिळवणारा पहिला कबड्डीपटू बनण्याचा मान प्रदीपने पटकावला आहे. त्याच्या शानदार कामगिरीमुळे पाटणा पायरेट्सने सोमवारी तमिळ थलायव्हाला ५१-२५ अशी धूळ चारून पराभवाची मालिका खंडीत केली.

सलग सहा पराभव पत्करल्यानंतर प्रथमच पाटणाने विजय मिळवला. विशेष म्हणजे प्रदीपने मिळवलेले २६ चढायांचे गुणच दोन्ही संघांमधील जय-पराजयाचे अंतर ठरले. प्रदीपच्या खात्यावर आता चढायांचे १०१६ तर एकूण १०२३ गुण जमा आहेत. दुसऱ्या सामन्यात यूपी योद्धाने सलग चौथ्या विजयाची नोंद करताना गुजरात फॉच्र्युनजाएंट्सला ३३-२६ अशी धूळ चारली. योद्धासाठी श्रीकांत जाधव आणि सुरेंद्र गिल या दोघांनी प्रत्येकी सहा गुण मिळवले.

सचिनच्या १० चढायांच्या गुणानंतरही गुजरातला या हंगामातील आठवा पराभव टाळणे जमले नाही. तर योद्धाने मात्र या विजयासह गुणतालिकेत पाचव्या स्थानी झेप घेतली.