भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनीने १५ ऑगस्ट रोजी संध्याकाळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. भारतीय संघाला टी-२० विश्वचषक, वन-डे विश्वचषक आणि चॅम्पिअन्स ट्रॉफी जिंकवून देणारा यशस्वी कर्णधार अशी धोनीची ओळख संपूर्ण जगाला आहे. धोनीच्याच नेतृत्वाखाली भारतीय संघाने २०११ साली मुंबईच्या वानखेडे मैदानावर श्रीलंकेवर मात करत विश्वचषक जिंकला. सचिन तेंडुलकरचा हा शेवटचा विश्वचषक असल्यामुळे ही स्पर्धा सर्वांना कायम लक्षात राहते.

धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केल्यानंतर क्रीडाविश्वासह सर्वच क्षेत्रातून त्याच्यावर पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देणाऱ्या ट्विट्सचा वर्षाव झाला. काही दिवसांपासून चर्चेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पार्थ पवार यांनीही धोनीला शुभेच्छा दिल्या. “आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतलेल्या महेंद्रसिंग धोनीला भविष्यातील त्याच्या योजनांसाठी शुभेच्छा. भारतीय क्रिकेट संघाला अनेक मोठे सन्मान प्राप्त करून देण्यात धोनीचा सिंहाचा वाटा होता. त्यासाठी धोनीचे आभार!”, असे पार्थ पवार यांनी ट्विट केले.

मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरसह विराट कोहली, रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, रवी शास्त्री आणि परदेशी खेळाडूंनीही धोनीच्या क्रिकेटमधील योगदानाला सलाम केला. क्रीडा, राजकारण, सामाजिक क्षेत्र, बॉलिवूड साऱ्याच क्षेत्रांतून धोनीच्या योगदानाला सलाम करण्यात आला आणि त्याला शुभेच्छा देण्यात आल्या. धोनीचा चेन्नई सुपर किंग्जचा सहकारी सुरैश रैना यानेही धोनीनंतर अवघ्या काही तासांत आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला.