पुरस्कारांचे गौडबंगाल भाग – ३
निवड समिती नेमणं, हा एक देखावा तर नसतो ना? जागतिक, आशियाई, राष्ट्रकुल किंवा किमानपक्षी राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धात पदकं मिळवणाऱ्यांचाच समावेश निवड समितीत केल्यामुळे अंतिम निवड अचूक व नि:पक्षपातीच असणार, अशी धूळफेक केली जात नसते ना? प्रस्थापित वर्गानं, आपले हितसंबंध राखण्यासाठी, चलाखीने चढवलेला हा एक फसवा मुखवटा तर नसतो ना?
शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार निवड समितीवर कुणाकुणाची नियुक्ती झाली होती?
या संदर्भात सरकारी विद्वानांनी बनवलेला जी.आर. काय सांगतो? महाराष्ट्र शासन, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्रमांक : शिछपु-२०११/प्र. कं.१९८/२०११/क्रीयुसे-२, दिनांक १ ऑक्टोबर २०११ नुसार निवड समितीत असावेत. १. क्रीडामंत्री, २. क्रीडा राज्यमंत्री, ३. अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/ सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, ४. महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रातील पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री तसेच राजीव गांधी खेलरत्न व द्रोणाचार्य पुरस्कारार्थी यामधून पाच, ५. क्रीडा आयुक्त/ संचालक.
सरकारमान्य विद्वज्जनांनी बनवलेल्या चौकटीनुसार खेलरत्न पुरस्काराची मानकरी व दोनदा विश्वचषक विजेती नेमबाज अंजली भागवत, नेमबाजीतील जगज्जेती तेजस्विनी सावंत, एशियाड व राष्ट्रकुल शर्यतीत पदके पटकावणारा एकमेव भारतीय जलतरणपटू वीरधवल खाडे, पहिला मराठी ग्रँडमास्टर बुद्धिबळपटू प्रवीण ठिपसे, राष्ट्रीय अजिंक्यवीर मल्ल काका पवार यांची नियुक्ती निवड समितीवर केली गेली. कसोटी क्रिकेटपटू रवी शास्त्री व झहीर खान प्रभृतींची नावे या संदर्भात घेतली गेली.
निवडप्रक्रियेतला हा पहिला भाग, देखाव्याचा अन् देखावा होता नक्कीच आकर्षक. मुखवटा होता नक्कीच प्रभावशाली. निवडीवरून काही वाद उद्भवलेच तर या लोकप्रिय प्रतिष्ठित खेळाडूंची ढाल शासनानं उभी करून ठेवली होती. काही शंका, काही प्रश्न असल्यास ‘त्यांना’ विचारा, अशी सोयही करून ठेवली होती.
म्हणजे आता कोणी गणपत भगवंत माने आणि रमेश एन. वीपट यांच्यावरून प्रश्न उपस्थित केले, तर क्रीडामंत्री माननीय विनोदजी तावडे व आयुक्त माननीय राजारामजी माने बोट दाखवू शकत होते अंजली भागवत व तेजस्विनी सावंत व वीरधवल खाडे व प्रवीण ठिपसे व काका पवार यांच्याकडे. पण येथे एक छोटासा प्रश्न उद्भवतो. मुळातच माने, वीपट या गणंगांची प्राधान्यानं निवड अंजली, तेजस्विनी, वीरधवल, प्रवीण व काका यांनी केली होती का?
का असंही काही घडलं (किंबहुना जे घडणारच होतं, अन् ज्यासाठी मुखवटय़ांची तजवीज चलाखीने केली गेली होती. तस्सच घडलं) आणि तज्ज्ञांची ही निवड डावलली गेली? आणि क्रीडामंत्री विनोदजी तावडे, क्रीडा आयुक्त माननीय राजारामजी माने आणि त्यांचे उजवे-डावे हात नरेंद्र सोपल व ‘बेंच प्रेस’फेम माणिक ठोसरे यांनी शोधून-हुडकून काढली दोन रत्ने, दोन युगपुरुष- गणपत भगवंत माने अन् रमेश एन. वीपट?
मी हे प्रश्न गंभीरपणे उपस्थित करत आहे. क्रीडा खात्याची जुनी कचेरी पुणे स्टेशनसमोरील सेंट्रल बिल्डिंग व बालेवाडी येथे काही धक्कादायक गोष्टी माझ्या कानी आल्या. तज्ज्ञ निवड समितीने मुळात प्राधान्यानं पसंती दिली होती आशियाई क्रीडा स्पध्रेमधील एका माजी विजेत्या खेळाडूला. या महिलेने हॉकीतही भारताचे प्रतिनिधित्व केले होते. त्याचप्रमाणे एका अभिनव व मूलभूत उपक्रमासह विविध खेळांच्या राष्ट्रीय स्पर्धा-सामने भरवणाऱ्या आणि दर्जेदार परदेशी संघांची प्रात्यक्षिके मुंबईत सादर करवणाऱ्या एका सेवाभावी संघटकानेही निवड समितीची पसंती मिळवली होती. सालाबादप्रमाणे काही विशिष्ट हेतूने त्या बैठकीत आलेल्या प्रभावशाली टोळीचे मनसुबे उधळले गेले होते. त्या बैठकीत त्यांना चूपचाप राहावे लागले, पण त्यानंतर त्यांनी भराभर चाव्या फिरवल्या व निवड समितीचे निर्णय साफ पलटवले. असंही सांगतात की, दस्तुरखुद्द क्रीडामंत्र्यांनीच याचं सूतोवाच करून ठेवलेलं होतं. निवड समिती सदस्यांचं अभिनंदन एकीकडे केले व चेहऱ्यावर स्मितहास्य येऊ न देता अशीही पुस्ती जोडली, शासनाला काही बाबतीत फेरविचार करावा लागतोही.
हे खरे असेल का? मला आठवतं एक सुभाषित: ए मॅन मे स्माइड अ‍ॅँड स्माइल- अँड येट बी ए व्हिलन!
क्रीडा खात्यात असंही बोललं जातं की, दस्तुरखुद्द आयुक्तांना प्रल्हाद सावंत यांचं प्यादं पुढे सरकवायचं होतं, पण त्याला सर्वाचाच कडवा विरोध पाहून त्यांनी तात्पुरती माघार घेतली. मग काही प्रभावशाली व्यक्तींनी ठेवणीतली नावं पुढे केली. त्यातून तीन लाख रुपयांची सुवर्णमाला दोन युगपुरुषांच्या गळ्यात टाकली गेली. असं म्हणतात, तेव्हा मोठाच जल्लोष झाला. तज्ज्ञांची जिरवली, आता यंदा जे जमलं नाही, ते पुढच्या वर्षी जमवून दाखवू, असंही सांगितलं गेलं.
ही सारी माहिती अस्वस्थ करणारी, अनपेक्षित मुळीच नसली तरी देवेंद्र फडणवीस यांच्या कारकीर्दीत तरी काही सुधारणांची अपेक्षा धरणाऱ्यांची निराशा करणारी. म्हणूनच क्रीडामंत्री माननीय विनोदजी तावडे यांच्यापुढे काही मुद्दे ठेवतो. पारदर्शक कारभाराची हमी देणाऱ्या विनोदजींनी, पुरस्कार वितरणाआधी त्याबाबत नि:संदिग्ध खुलासा द्यावा, हीच अपेक्षा.
१. शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन पुरस्कारासाठी २०१२-१३ आणि २०१३-१४साठी कोणाकोणाचे किंवा कोणाकोणासाठी अर्ज आले होते, त्यांची नावे सांगा.
२. आलेल्या एकंदर अर्जातून, सारे अर्ज वा काही मोजके अर्जच निवड समितीपुढे ठेवले गेले? आलेल्या अर्जापैकी कुणाकुणाचे अर्ज निवड समितीपुढे ठेवले गेले अन् कुणाकुणाचे अर्ज मागे ठेवले गेले?
३. अर्जाची ही चाळणी कुणी केली? कोणत्या अधिकारात केली? कोणत्या निकषांनुसार केली?
४. निवड समितीपुढे मूळ अर्ज ठेवले गेले, की त्या अर्जाचे संक्षिप्त टाचण ठेवले गेले? ही संक्षिप्त टाचणे कुणी बनवली?
५. या बैठकीला क्रीडामंत्री व क्रीडा आयुक्त यांखेरीज कोणकोण शासकीय कर्मचारी उपस्थित होते.
६. या बैठकीची आमंत्रणे कुणाकुणास व केव्हा पाठवली गेली? आमंत्रणे लेखी वा तोंडी वा एसएमएस इ. पद्धतीने पाठवली गेली? निमंत्रितांपैकी कोण कोण सदस्य गैरहजर होते?
७. निवड समितीने प्राधान्याने कोणत्या नावांची पसंती एकमुखाने दिली होती?
८. निवड समितीची प्राधान्याने व एकमुखाने केलेली निवड बदलली गेली असल्यास, कोणी व का बदलली?
९. निवड समितीची निवड डावलली गेली असल्यास निवड समिती कशासाठी नेमायची, याचा खुलासाही आवश्यक.
कळावे, लोभ असतोच, तसाच राहावा. म्हणजे निवड समितीची पाठही थोपटली जावी व तिचे निर्णयही डावलले जावेत. कारण लोभ आहे व तो तसाच ठेवायचाय!