पारुपल्ली कश्यप आणि एच. एस. प्रणॉय यांनी जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी दिली. प्रज्ञा गद्रे-सिक्की रेड्डी, प्रणव चोप्रा-अक्षय देवलकर यांनीही विजयी आगेकूच केली. तरुण कोना-सिक्की रेड्डी तसेच अरुण विष्णू-अपर्णा बालन यांना पराभवाला सामोरे जावे लागले.
गेल्या वर्षी झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या कश्यपने नेदरलँड्सच्या इरिक मेजिसवर २१-१७, २१-१० असा विजय मिळवला. दुसऱ्या फेरीत त्याची लढत व्हिएतनामच्या नग्युेन तिइन मिन्हशी होणार आहे. इंडोनेशिया स्पर्धेचे जेतेपद पटकवणाऱ्या प्रणॉयने ब्राझीलच्या अलेक्स युवान जोंगवर २१-१२, २१-१६ अशी मात केली. दुसऱ्या फेरीत ११व्या मानांकित प्रणॉयची लढत युगांडाच्या एडविन इकिरिंगशी होणार आहे.
महिला दुहेरीत प्रज्ञा गद्रे आणि सिक्की रेड्डी जोडीने जर्मनीच्या इसाबेल हेरटिच आणि बिरगिट मिचेल्स जोडीला १६-२१, २१-१५, २१-१४ असे नमवले. मिश्र दुहेरीत तैपेईच्या लाओ मिन चुन आणि चेन सिओ ह्य़ुआन जोडीने सिक्की रेड्डी आणि तरुण कोना जोडीचा २१-१३, २१-१७ असा पराभव केला. रशियाच्या इव्हेन्जी ड्रेमीन आणि इव्हेन्जी डिमोव्हा जोडीने अरुण विष्णू आणि अपर्णा बालन जोडीवर २१-१८, १०-२१, २४-२२ असा विजय मिळवला. पुरुष दुहेरीत अक्षय देवलकर आणि प्रणव चोप्रा जोडीने रशियाच्या निकिता खाकीमोव्ह आणि व्हॅसिली कुझनेत्सोव्ह जोडीवर १७-२१, २१-११, २१-११ अशी मात केली.