भारताचा अव्वल बॅडमिंटनपटू पारुपल्ली कश्यपने गेल्या वर्षी राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली होती. मात्र त्यानंतर दुखापती आणि सातत्याचा अभाव यामुळे कश्यपच्या कामगिरीत घसरण झाली होती. प्रीमिअर बॅडमिंटन लीग या नव्या कोऱ्या स्पर्धेद्वारे दमदार पुनरागमनासाठी कश्यप सज्ज झाला आहे.
‘‘हैदराबाद संघाचा भाग झालो, याचा आनंद आहे. इंडियन बॅडमिंटन लीग स्पर्धेत मी बंगळुरूचे प्रतिनिधित्व केले होते. असंख्य रंजक लढतींसाठी मी आतुर आहे. कौशल्य सिद्ध करण्यासाठी मी सज्ज आहे. प्रदीर्घ कालावधीसाठी दुखापतींनी मला सतावले. आता मी नियमित सरावाला सुरुवात केली आहे. या स्पर्धेद्वारे आंतरराष्ट्रीय स्तरावर परतण्यासाठी उत्तम सराव होईल,’’ असे कश्यपने सांगितले.
जागतिक क्रमवारीत कश्यप सध्या १५व्या स्थानी आहे. त्याबाबत विचारले असता कश्यप म्हणाला, ‘‘पुरुष गटात स्पर्धा अतिशय चुरशीची आहे. त्यामुळे क्रमवारीत अव्वल दहामध्ये स्थान पटकावणे कठीण आहे. याआधी मी अव्वल दहामध्ये धडक मारली आहे. या टप्प्यात स्थिरावण्यासाठी सातत्यपूर्ण कामगिरी आवश्यक असते. लवकरच मी पुन्हा अव्वल दहामध्ये असेन.’’
प्रीमिअर बॅडमिंटन लीग स्पर्धेत सहकारी किदम्बी श्रीकांत, एच. एस. प्रणॉय यांच्याविरुद्ध खेळण्यासाठी उत्सुक आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या ली चोंग वेई, मार्किस किडो आणि कर्स्टन मॉगेन्सन या अव्वल खेळाडूंकडून शिकण्याची संधी आहे.

 

श्रीकांतविरुद्धच्या सलामीच्या लढतीसाठी कश्यप उत्सुक
दुखापतीतून सावरलेल्या बॅडमिंटनपटू पारुपल्ली कश्यपला प्रीमिअर बॅडमिंटन लीगद्वारे दमदार पुनरागमन करायचे आहे. बंगळुरू टॉप गन्सचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कश्यपला सलामीची लढत सहकारी आणि मित्र किदम्बी श्रीकांतविरुद्ध होणार आहे. मित्राविरुद्धच्या या लढतीसाठी कश्यप उत्सुक आहे.
‘‘पहिल्या लढतीसाठी मी आतुर आहे. बहुतांशी ही लढत श्रीकांतविरुद्ध होणार आहे. आम्ही दोघे एकमेकांविरुद्ध खेळणे रंजक ठरणार आहे. या लढतीद्वारे चाहत्यांना अव्वल दर्जाच्या खेळाची पर्वणी मिळेल, अशी आशा आहे,’’ असे कश्यपने सांगितले. प्रीमिअर बॅडमिंटन लीग स्पर्धा २ जानेवारीपासून मुंबईत सुरू होत आहे. सलामीच्या लढतीत मुंबई रॉकेट्स आणि अवध वॉरियर्स समोरासमोर असणार आहेत. या दोन संघांसह स्पर्धेत दिल्ली एसर्स, हैदराबाद हंटर्स, बंगळुरू टॉप गन्स, चेन्नई स्मॅशर्स हे संघ असणार आहेत.