दुबळ्या आर्यलडविरुद्धच्या सामन्यात बरोबरी स्वीकारणाऱ्या भारताला जागतिक हॉकी लीग (तिसरी फेरी) स्पर्धेतील आव्हान टिकविण्यासाठी नेदरलँड्स (हॉलंड) या बलाढय़ संघाविरुद्ध खडतर कसोटीला सामोरे जावे लागणार आहे. हा सामना येथे शनिवारी होणार आहे.
आर्यलडविरुद्धच्या सामन्यात भारताचे पारडे जड मानले जात होते, मात्र बचाव फळीतील खेळाडूंच्या खराब कामगिरीमुळे भारताने या सामन्यात विजयाची संधी गमावली. रूपींदरपाल सिंग याने केलेल्या दोन गोलमुळेच भारताला हा सामना ४-४ असा बरोबरीत ठेवता आला. आर्यलडच्या तुलनेत नेदरलँड्सचा संघ खूपच बलाढय़ आहे. जागतिक क्रमवारीत त्यांना चौथे मानांकन आहे तर भारताला अकरावे स्थान आहे. हॉलंडला घरच्या मैदानावर खेळण्याचाही फायदा मिळणार आहे. आयरिश संघाविरुद्ध भारतीय खेळाडूंमध्ये समन्वयाचा अभाव दिसला. त्यामुळेच त्यांनी गोल करण्याच्या अनेक सोप्या संधी वाया घालविल्या. अशा चुका ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या हॉलंडविरुद्ध त्यांना परवडणार नाही. हॉलंडने पहिल्या सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध ३-३ अशी बरोबरी स्वीकारली होती.
हॉलंडबरोबरच्या लढतीत व्ही. आर. रघुनाथ, आकाशदीप सिंग व शिवेंद्र सिंग यांनी चुका टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कर्णधार सरदारा सिंग याला अन्य खेळाडूंची चांगली साथ मिळणे आवश्यक आहे. गोलरक्षक पी. आर. श्रीजेश याला आर्यलडविरुद्धच्या लढतीत मोठी दुखापत झाली होती. त्यामुळे हॉलंडविरुद्धच्या लढतीत त्याचा सहभाग अनिश्चित झाला आहे. त्याच्याऐवजी पी. टी. राव याच्याकडे गोलरक्षणाची जबाबदारी सोपविली जाण्याची शक्यता
आहे.    
महिलांमध्ये भारताची बेल्जियमशी बरोबरी
रॉटरडॅम : अनुपा बार्ला हिने नोंदविलेल्या गोलच्या बळावर भारताने जागतिक हॉकी लीगमधील महिलांच्या लढतीत  बेल्जियमला १-१ असे बरोबरीत रोखले.
भारताला पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने ७-० अशी धूळ चारली होती. त्या तुलनेत बेल्जियमविरुद्ध भारतीय खेळाडूंनी जिद्दीने खेळ केला. सामन्याच्या चौथ्या मिनिटाला बेल्जियमच्या एरिका कोप्पी हिने संघाला आघाडी मिळवून दिली. पहिल्या ३५ मिनिटांमध्ये बेल्जियमच्या खेळाडूंनीच खेळावर नियंत्रण राखले होते, मात्र नंतर भारतीय खेळाडूंना सूर गवसला. ३८व्या मिनिटाला बार्ला हिने गोल करीत संघास १-१ अशी बरोबरी मिळवून दिली. रितू राणी हिच्या नेतृत्वाखाली भारतीय खेळाडूंनी चांगला समन्वय दाखविला. गोल करण्याच्या अचूकतेमध्ये ते कमी पडले, मात्र पहिल्या सामन्याच्या तुलनेत त्यांनी गोलवर उत्तम नियंत्रण दाखविले. पूर्वार्धात त्यांनी गोल करण्याच्या दोन संधी दवडल्या, अन्यथा हा सामना भारताला जिंकता आला असता.