पॅरिस : रशियाची ३१वी मानांकित अनास्तासिया पाव्हल्यूचेन्कोव्हाने गुरुवारी प्रथमच फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत महिला एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली. शनिवारी जेतेपदाच्या लढतीत तिची बाबरेरा क्रेजिकोव्हा किंवा मारिया सकारीशी गाठ पडेल.

फिलिपे चॅट्रियर कोर्टवर झालेल्या या उपांत्य लढतीत पाव्हल्यूचेन्कोव्हाने स्लोव्हेनियाच्या बिगरमानांकित तामरा झिदानसेकवर ७-५, ६-३ असे सरळ दोन सेटमध्ये वर्चस्व गाजवले. २९ वर्षीय पाव्हल्यूचेन्कोव्हाची ही ग्रँडस्लॅम स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरी ठरली. यापूर्वी तिने अन्य तीन ग्रँडस्लॅम स्पर्धाची किमान उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. परंतु तिला कधीच उपांत्य फेरीत प्रवेश करणे जमले नाही. यावेळी तिने थेट अंतिम फेरीपर्यंत मजल मारली.

माझ्यासाठी हा अत्यंत भावनिक क्षण आहे. मी शारीरिकदृष्टय़ा थकली आहे. परंतु येथे उपस्थित असलेल्या माझ्या पाठीराख्यांमुळे मला किमान संवाद साधण्यासाठी ऊर्जा मिळाली आहे. कोणताही टेनिसपटू ग्रँडस्लॅम स्पर्धा खेळण्याच्या हेतूने कारकीर्दीला सुरुवात करतो. त्यामुळे अंतिम फेरी गाठल्यावर त्याला होणारा आनंद निराळाच असतो.

-अनास्तासिया पाव्हल्यूचेन्कोव्हा