राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष संदीप पाटील यांचे मत

क्लब क्रिकेट ही मुंबई क्रिकेटची नाळ आहे. राष्ट्रीय संघातून खेळणारे दिग्गज आणि सध्याचे खेळाडू क्लबच्या संघांकडून खेळत नाहीत. क्लब क्रिकेटकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे मुंबई क्रिकेटची पीछेहाट होत आहे, अशी चिंता भारताचे माजी क्रिकेटपटू आणि राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी व्यक्त केली.
युवा क्रिकेटपटू घडवण्याच्या शिवाजी पार्क जिमखान्याच्या क्रिकेट अकादमीच्या उपक्रमात संदीप पाटील सल्लागाराच्या भूमिकेत असणार आहेत. याबाबतच्या पत्रकार परिषदेत पाटील यांनी नेमक्या शब्दांत मुंबईच्या क्रिकेटचे आत्मपरीक्षण केले. ‘‘लंडन दौऱ्यावरून पहाटे मुंबईत आल्यावर थेट कांगा क्रिकेट सामन्याला हजर राहणाऱ्या सुनील गावस्कर यांचे उदाहरण दिले जाते. परंतु गावस्करच नव्हे, तर आम्ही सर्वच जण पुरुषोत्तम, तालीम, कांगा लीग अशा स्पर्धाच्या तारखा पाहायचो, त्यानुसार परतीचा कार्यक्रम आखायचो. पॉली उम्रीगर, रमाकांत आचरेकर आणि अजित वाडेकर यांच्यासारखे खेळाडू तर क्लबचा एकही सामना चुकवायचे नाहीत. त्यामुळेच क्लबच्या क्रिकेटचा दर्जा मोठा होता. पण सध्याचे क्रिकेटपटू मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळण्यात व्यस्त असतात,’’ असे पाटील यांनी सांगितले.
‘‘मुंबईने ४० वेळा रणजी विजेतेपद पटकावले आहे, याचा आपण अभिमानाने उल्लेख करतो. पण आता इतिहासाऐवजी, भविष्याचा म्हणजेच उद्याच्या सामन्याचा विचार करायला हवा. मुंबईच्या क्रिकेटचा गांभीर्याने विचार करायला हवा,’’ असे पाटील यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, ‘‘ सल्लागाराची भूमिका बजावताना निवड समितीचा अध्यक्ष म्हणून बीसीसीआयच्या हितसंबंधांविषयक कोणत्याही नियमांचे उल्लंघन होणार नाही. कारण मी प्रशिक्षक किंवा संघनिवडीच्या प्रक्रियेत सहभागी होणार नाही. मात्र राष्ट्रीय क्रिकेट अकादमीतील अनुभवाचा मला उपयोग होईल.’’
ट्वेन्टी-२० आणि एकदिवसीय मालिकेतील लागोपाठच्या पराभवांमुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांप्रमाणेच पाटील यांना दु:ख झाले आहे. ते म्हणाले, ‘‘जेव्हा भारतीय संघ हरतो, तेव्हा वाईट वाटणे, हे स्वाभाविक आहे. याचप्रमाणे टीका करण्याचाही तुम्हाला अधिकार आहे. परंतु या पराभवातून शिकण्याची आणि आत्मपरीक्षण करण्याची नितांत आवश्यकता आहे. मागील विजय विसरून पुढील सामन्यांतील विजयाकडे लक्ष केंद्रित करायची गरज आहे.’’

शिवाजी पार्क जिमखान्यातर्फे मोफत क्रिकेट अकादमी
शिवाजी पार्क जिमखान्यातर्फे १४ आणि १६ वर्षांखालील निवडक २५ खेळाडूंची तीन वर्षांच्या मोफत प्रशिक्षणासाठी निवड करण्यात येणार आहे. इच्छुकांनी १५ आणि १६ नोव्हेंबरला सकाळी १० वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन शिवाजी पार्क जिमखान्याचे सरचिटणीस संजीव खानोलकर यांनी केले आहे.