प्रीमिअर बॅडमिंटन लीगमधील सेमी फायनलमध्ये पी व्ही सिंधूने सायना नेहवालवर १०- ७ , १०-८ ने मात केली आहे. पीबीएल स्पर्धेत सिंधू चेन्नई स्मॅशर्सचे प्रतिनिधित्व करते.

बॅडमिंटन प्रीमिअर लीगमध्ये शुक्रवारी चेन्नई स्मॅशर्सची पी व्ही सिंधू आणि अवध वॉरियर्सची सायना नेहवाल यांच्यात लढत होती. रिओ ऑलिम्पिकमधील रौप्य पदक विजेती सिंधू आणि २०१२ ऑलिम्पिकमधील कांस्य पदक विजेती सायना या दोघांच्या लढतीकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. सामन्याच्या सुरुवातीपासून पी व्ही सिंधूने पकड मजबूत केली होती. पहिल्या सेटमध्ये सायनाने तिला काँटे की टक्कर दिली. पण सिंधूने मोक्याच्या क्षणी खेळ उंचावत पहिला सेट १० – ७ ने जिंकला.

दुस-या सेटमध्येही सिंधूने आक्रमक खेळी करत सायनाची दमछाक उडवली. सिंधूच्या आक्रमक खेळीसमोर सायना अपयशी ठरत होती. दुस-या सेटमध्ये या दोन्ही खेळाडूंमध्ये ४८ शॉटची रॅलीदेखील झाली. दोघींचा हा खेळ बघणे उपस्थित क्रीडा प्रेमींसाठी एक पर्वणीच होती. दुस-या सेटमध्ये सिंधूने सायनावर १० – ८ ने विजय मिळवला. सिंधूच्या विजयामुळे चेन्नई स्मॅशर्सने अवध वॉरियर्सवर आघाडी घेतली आहे.

प्रीमिअर बॅडमिंटन लीगच्या सलामीच्या सामन्यात भारतीय बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधूला पराभवाचा सामना करावा लागला होता. हैदराबादच्या कोर्टवर रंगलेल्या पहिल्या सामन्यात जागतिक क्रमवारीतील पहिल्या स्थानावरील स्पेनच्या कॅरोलिना मारिनने सिंधूला पराभवाचा धक्का दिला. पहिल्या सामन्यात कॅरिलिनानाने सिंधूवर ८-११,१४-१२,२-११ असा विजय मिळविला होता.