प्रीमिअर बॅडमिंटन लीग

नवी दिल्ली : ऑलिम्पिक पदकविजेती पी.व्ही.सिंधू, सायना नेहवाल, किदम्बी श्रीकांत आणि कॅरोलिना मरिन यांना प्रीमिअर बॅडमिंटन लीगमध्ये सर्वाधिक ८० लाख रुपयांची बोली लागली. भारताचा दुहेरीतील प्रमुख खेळाडू सात्त्विकसाईराज रॅँकीरेड्डी यालादेखील अनपेक्षितपणे ५२ लाखांची बोली लागली. सर्व खेळाडू २०१५नंतर प्रथमच लिलावात आले होते. त्यामुळे प्रायोजकांनी आदर्श खेळाडूंबरोबरच त्यांच्या संघाचा समतोल साधण्यावरही भर दिल्याचे दिसून आले. इंडोनेशियाचा टॉमी सुगिआर्तो या खेळाडूला दिल्ली डॅशर्सनी अनपेक्षितपणे ७० लाखांची बोली लावली.

सिंधू हैदराबादकडे

आतापर्यंत चेन्नई स्मॅशर्सकडून खेळणारी पी.व्ही. सिंधू येत्या हंगामात हैदराबादचे प्रतिनिधित्व करणार आहे. सायना नेहवाल नॉर्थ-ईस्टर्न वॉरियर्सचे प्रतिनिधित्व करणार आहे आणि व्हिक्टर अ‍ॅक्सेलसन अहमदाबाद स्मॅश मास्टर्स तर श्रीकांत हा बेंगळूरु रॅप्टोर्स, एच.एस. प्रणॉय हा दिल्ली डॅशर्सकडून खेळणार आहे.

मरिन पुण्याकडे

मागील स्पर्धेत हैदराबाद हंटर्सला विजेतेपद मिळवून देणाऱ्या मरिनला यंदा पुण्याने सर्वात मोठी ८० लाखांची बोली लावली. त्यामुळे आता मरिन यंदा नव्यानेच या स्पर्धेत उतरणाऱ्या अभिनेत्री तापसी पन्नू सहमालकीण असलेल्या पुणे सेव्हन एसेस संघाकडून खेळणार आहे.