पाकिस्तान सुपर लीग टी-२० स्पर्धेचा दुसरा टप्पा आजपासून (९ जून) यूएईत सुरू होत आहे. तत्पूर्वी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) सीईओ वसीम शेख यांनी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) आणि पीएसएलबद्दल भाष्य केले. करोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे पीएसएल २०२१ मार्चमध्ये स्थगित करण्यात आली. मात्र, आता स्पर्धेला पुन्हा सुरुवात होणार असून अंतिम सामना २४ जूनला खेळवण्यात येईल.

हेही वाचा – ‘‘टीम इंडियाला माझी गरज, मी कौशल्य दाखवलं तर वर्ल्डकप जिंकता येईल”

पीसीबीचे सीईओ वसीम शेख यांनी आयपीएल आणि पीएसएलची तुलना केली. आयपीएलच्या पातळीपर्यंत पोहोचण्यासाठी काय करावे लागेल, याचा उलगडा शेख यांनी केला. ते म्हणाले, ”आम्ही लीग विकसित करण्याचा प्रयत्न करत आहोत. आयपीएलसोबत तुलना करण्यापूर्वी आपण हे पाहिले पाहिजे, की मोठ्या खेळाडूंसाठी ते २-३ मिलियन डॉलर्स देत आहेत. आपण खेळाडूंना असे मानधन दिले, तर मोठे खेळाडू या लीगकडे आकर्षित होतील.”

हेही वाचा – अभिनंदन अजिंक्यसेना..! टीम इंडियाच्या ‘त्या’ पराक्रमाचा ICCनं केला मोठा सन्मान

शेख म्हणाले, ”आपल्याला पीएसएलची इकोसिस्टीम फायदेपूर्ण करायची आहे, जेणेकरून खेळाडूंवर जास्त पैसे खर्च करता येतील. एकदा का आपण हे केले, तर एबी डिव्हिलियर्ससारखे मोठे खेळाडू पीएसएलमध्ये खेळतील. नजीम सेठींच्या म्हणण्यानुसार, आम्ही पीएसएलची वाट लावली. पण तुम्ही हेसुद्धा पाहा, की फ्रेंचायझी आर्थिकदृष्ट्या १० वर्षासाठी शाश्वत नाहीत. आम्ही त्यावर काम करत आहोत. जास्त उत्पन्न मिळवण्यासाठी काय करता येईल यावर काम चालले आहे. या कारणामुळेच पीएसएलमध्ये अतिरिक्त संघ खेळवता येत नाहीत.”