पाकिस्तानचे माजी कर्णधार रमीझ राजा यांची पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (पीसीबी) अध्यक्षपदी निवड झाली. या नियुक्तीनंतर काही तासांनी त्यांनी धमाकेदार निर्णय घेत पाकिस्तानी क्रिकेपटूंना खुश केले आहे. राजांनी सर्व देशांतर्गत खेळाडूंच्या मासिक पगारामध्ये एक लाख रुपये वाढ करण्याचे आदेश दिले. पीसीबीने सांगितले की, १९२ देशांतर्गत क्रिकेटपटूंचे मानधन तात्काळ प्रभावाने वाढवले ​​जाईल.

मानधनामध्ये वाढ झाल्यामुळे आता प्रथम श्रेणी आणि श्रेणी स्पर्धा खेळणाऱ्या क्रिकेटपटूंचे मानधन दरमहा १,४०,००० ते २,५०,००० रुपये झाले आहे. पीसीबीने याबाबत सांगितले की, नवीन अध्यक्षांच्या सर्व वर्गांमधील मानधन वृद्धि करण्याच्या आदेशामुळे ग्रुप डी वर्गातील खेळाडूंच्या वेतनात २५० पट वाढ होणार आहे.

हेही वाचा – ENG vs IND : “रद्द झालेल्या सामन्याऐवजी…”, बीसीसीआयनं इंग्लंड क्रिकेट बोर्डाला दिली ऑफर!

पीसीबी अध्यक्षांनी सध्या भारतासोबत चांगले संबंध बनवणे कठीण असल्याचे मत दिले. “आता हे असंभव आहे, कारण राजकारणामुळे खेळावर वाईट परिणाम पडला आहे. आम्ही याबाबत घाई नाही कारणार. आम्हाला आमच्या देशांतर्गत आणि स्थानिक क्रिकेटवर लक्ष केंद्रित करायचे आहे”, असे राजा म्हणाले.

वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानने भारताचा पराभव करावा – राजा

रमीज राजा यांना २४ ऑक्टोबर रोजी दुबईत होणाऱ्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील टी-२० वर्ल्डकप सामन्याबद्दल विचारण्यात आले. ते म्हणाले, ”जेव्हा मी पाकिस्तानी संघाच्या खेळाडूंना भेटलो, तेव्हा मी त्यांना सांगितले की, या वेळी समीकरण बदलायला हवे आणि संघ या सामन्यासाठी शंभर टक्के तयार असावा आणि त्यात त्याने चांगली कामगिरी केली पाहिजे.”

आगामी टी-२० वर्ल्डकपसाठी मॅथ्यू हेडन आणि व्हर्नान फिलेंडर यांना पाकिस्तानचे अनुक्रमे मुख्य प्रशिक्षक आणि गोलंदाजी प्रशिक्षक बनवले जाणार आहे.