सप्टेंबर महिन्यात खेळवल्या जाणाऱ्या आशिया चषकाच्या यजमानपदाचा सावळागोंधळ अद्याप सुरुच आहे. शुक्रवारी BCCI अध्यक्ष सौरव गांगुली यांनी दुबईत ही स्पर्धा खेळवली जाणार असून, भारत-पाकिस्तान हे दोन्ही संघ या स्पर्धेत सहभागी होतील असं जाहीर केलं. मात्र पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष एहसान मणी यांनी दिलेल्या माहितीनुसार, यजमानपदाबद्दल अंतिम निर्णय अद्याप झालेला नाहीये. आशियाई क्रिकेट परिषदेच्या आगामी बैठकीत याबद्दल निर्णय घेतला जाईल…ते इंडियन एक्स्प्रेस वृत्तपत्राशी बोलत होते.

“आशियाई क्रिकेट परिषदेची संलग्न सदस्य आहेत त्यांच्यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात येते. त्या सर्वांचा विचार करुन अंतिम निर्णय घ्यायचा आहे. आमच्यासमोर काही पर्याय खुले आहेत, मात्र सर्वांचं मत लक्षात घेतल्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल. स्पर्धा दुबईत खेळवण्याबाबत बैठकीत निर्णय घेतला जाईल.” एहसान मणी यांनी पाक क्रिकेट बोर्डाची भूमिका मांडली.

अवश्य वाचा –  Asia XI T20Is : भारतीय खेळाडूंच्या नावावर BCCI कडून अद्याप शिक्कामोर्तब नाही

दहशतवादाच्या मुद्द्यावरुन भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये सध्या क्रिकेट मालिका खेळवली जात नाहीये. पाकिस्ताननेही काही दिवसांपूर्वी श्रीलंका आणि बांगलादेश या संघांना पाकिस्तानात आमंत्रित करत कसोटी मालिकेचं यशस्वी आयोजन करुन दाखवलं होतं. २०१२-१३ सालानंतर भारत-पाकिस्तान यांच्यात द्विपक्षीय मालिका खेळवली गेलेली नाही. मध्यंतरी काही माजी पाकिस्तानी खेळाडूंनीही भारत-पाक मालिका सुरु करणं गरजेचं असल्याचं म्हटलं होतं.