पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे नवनिर्वाचीत अध्यक्ष एहसान मणी यांनी, बीसीसीआयच्या धोरणांवर जोरदार टीका केली आहे. २०१४-१५ सालात बीसीसीआयने दोन क्रिकेट बोर्डांमध्ये झालेला करार मोडून भारत-पाक मालिकेतून माघार घेतली. “मात्र बीसीसीआयची धोरणं विरोधाभास निर्माण करणारी आहेत. आशिया चषक, विश्वचषकासारख्या स्पर्धांमध्ये ते आमच्याशी खेळायला तयार आहेत. मात्र दोन देशांमध्ये होणाऱ्या मालिका खेळण्यासाठी त्यांना समस्या आहेत”, असोसिएट प्रेसला दिलेल्या मुलाखतीत मणी यांनी पाक क्रिकेट बोर्डाची बाजू मांडली.

भारताने मालिका खेळण्यासाठी नकार दिल्यानंतर, पाक क्रिकेट बोर्डाला ७० मिलीअन डॉलर्सचा फटका बसला आहे. यानंतर भारत आणि पाकिस्तानचे संघ २०१५ विश्वचषक आणि २०१७ चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये समोरासमोर आले आहेत. १५ सप्टेंबरपासून युएईत सुरु होणाऱ्या आशियाई चषकांसाठी आता भारत-पाक संघ पुन्हा एकदा भिडणार आहेत. सध्या दोन क्रिकेट बोर्डांमधले वाद, आयसीसीच्या तंटा-निवारण लवादासमोर आहेत. १ ऑक्टोबरपासून या प्रकरणावर कामकाजाला सुरुवात होणार आहे. चर्चेमधून हा वाद सोडवला जाऊ शकला असता, मात्र आता यावर चर्चा करणं कठीण होऊन बसल्याचं मणी यांनी सांगितलं.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी मणी यांची क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षपदावर नेमणुक केली होती. मणी यांच्याकडे आयसीसीमध्ये काम करण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे. सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतावादाचं कारण देऊन भारत सरकारने दोन देशांमधील क्रिकेट सामन्यांना परवानगी नाकारली होती. मध्यंतरीच्या काळात शशांक मनोहर बीसीसीआयचे अध्यक्ष असताना त्रयस्थ ठिकाणी सामने खेळवण्याबद्दल विचार सुरु होता, मात्र हा प्रस्तावही बारगळला. त्यामुळे आयसीसी आता या प्रकरणावर काय निर्णय घेतंय याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.