कराची : भारतासमवेत क्रिकेटचे सामने व्हावेत, यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने पुढाकार घेऊन त्यांची जबाबदारी पार पाडावी, अशी विनंतीवजा गळ पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष एहसान मणी यांनी घातली आहे.
या विषयासंदर्भात मणी म्हणाले, ‘‘मी आयसीसीत असताना त्याबाबत यापूर्वीच बोललो आहे. परंतु, मी आता पीसीबीवर कार्यरत असल्याने या विषयावर अधिक परिणामकारकपणे त्यावर बोलणार आहे. जर भारत आणि पाकिस्तान एकमेकांशी एकमेकांच्या देशात खेळणार नसतील, तर मग ते आयसीसीत एकमेकांविरुद्ध कसे खेळतात?’’
भारत आणि पाकिस्तानदरम्यान २००७ साली झालेल्या कसोटी मालिकेनंतर या दोन्ही देशांमध्ये एकही मालिका खेळवण्यात आलेली नाही. २०१२-१३ साली पाकिस्तानने भारतासमवेत निर्धारित षटकांची एक मालिका खेळली होती. मात्र, २००८ साली मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर या दोन्ही देशांमध्ये एकही कसोटी मालिका झालेली नाही.
भारत पाकिस्तानशी मालिका खेळत नसल्याने ७० दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची नुकसानभरपाई पाकिस्तानने द्यावी, अशी याचिका पाकिस्तानने केली असून त्याबाबत आयसीसीच्या वादनिवारण समितीने अद्यापही त्यांचा निकाल दिलेला नाही.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 10, 2018 2:50 am